कोल्हापूर- उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. मात्र कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. महाराष्ट्र बंदचा कोणताही परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिसत नसून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी....
उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे भाजपा नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घुसवून शेतकऱ्यांना चिरडून मारले. यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना पाठिंबा दिला असून आज (सोमवारी) संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. यामध्ये राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातून रविवारी दुपारपासूनच फळ भाज्यांची आवक झाली होती. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सकाळच्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरू करण्याची परवानगी बाजार समितीने दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र बंद चा परिणाम बाजार समितीमध्ये दुपारनंतर जाणवू शकतो. सकाळच्या टप्प्यात सर्व व्यवहार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आणि ग्राहक वर्गाला मात्र दिलासा मिळाला आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद राहतील असा संभ्रमावस्थेत शेतकरी होता. त्यामुळे बाजार समितीत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. असे चित्र असले तरी बाजार समितीतील व्यवहार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर कांदा- बटाटे, गूळ सौदे सुरू असल्याने आवक-जावक सुरू आहे.
हेही वाचा - MaharashtraBandh : मुंबईमधील बस, रिक्षासह दुकाने राहणार बंद
हेही वाचा - महाराष्ट्रात आज राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद