कोल्हापूर - आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला (Bail Granted to Nitesh Rane) आहे. याबाबतचा युक्तीवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. मात्र, निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज याबाबतचा निर्णय आला असून, जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळताच कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाबाहेर जल्लोष साजरा केला.
आमदार नितेश राणे हे सध्या पाठीचा आणि मानेच्या त्रासामुळे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल आहेत. जामीन मिळाल्याचा कळताच कार्यकर्त्यांनी सीपीआर रुग्णालय परिसरात जल्लोष केला आहे.
- नितेश राणे याची सिटी अँजिओग्राफी केली जाणार
सायंकाळी 6 वाजता आमदार नितेश राणे याची सिटी अँजिओग्राफी केली जाणार आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे सिटी अँजिओग्राफी केली जाणार आहे. चार डॉक्टरांच्या उपस्थित नितेश राणे यांचे सिटी अँजिओग्राफी होणार आहे. ही टेस्ट करणार असल्यामुळे नितेश राणे यांना मागील चार तासांपासून कोणतेही अन्न देण्यात आले नाही, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
- नितेश राणे यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू -
छातीत तसेच पाठीचा त्रास सुरू झाल्याने आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात कोल्हापुरात हलवण्यात (Nitesh Rane was shifted to Kolhapur) आले. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना येथील 'आयसीयू'मध्ये हलवण्यात (Nitesh Rane in ICU) आले आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी दिली. राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
- काय आहे प्रकरण?
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणूक सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.