कोल्हापूर : आज अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजेच नवरात्रौत्सवाचा सातवा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची 'अगस्त्यकृत सरस्वती स्तवन' म्हणजेच 'अगस्ती कृत स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात' पूजा बांधण्यात आली आहे. करवीर निवासिनीचं हे मंदिर त्रिकूट प्रासाद म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर फक्त एकट्या महालक्ष्मीचे नसून महाकाली आणि महासरस्वती या तिघींचं आहे. तिघींचे तीन स्वतंत्र मंडप गाभारा आणि प्रदक्षिणा युक्त मंदिर आहे.
आज या मंदिरात दक्षिणाभिमुख महाकालीची विराजमान मूर्ती ही चतुर्भुज महिषासुरमर्दिनीच्या रुपात आहे. जी करवीरची शक्तीपीठ देवता आहे.महाष्टमीचा होम तिच्यासमोरच संपन्न होतो. तर महासरस्वतीची मूर्ती ही चतुर्भुज आणि बैठी असून, अभय अंकुश पाश वरद अशी आयुधे व मुद्रा धारण करते. या तिघींचेही दर्शन महर्षि अगस्तींनी घेतले होते. याच रूपामध्ये आजची आई अंबाबाईची पूजा बांधण्यात आली आहे.
दरम्यान, दरवर्षी देवीची विविध रुपात पूजा बांधली जाते. देवीच्या दर्शनाबरोबरच देवीची विविध रूपातील पूजा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी सर्वच भक्तांना ऑनलाईन स्वरूपात देवीच्या विविध रूपाचे दर्शन घ्यावे लागत आहेत. गेल्या 6 दिवसांपासून जवळपास 50 लाखांहून अधिक भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेतले आहे.