कोल्हापूर - 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज सायंकाळी तब्बल दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर असणार आहेत. दरवर्षी अनेक मद्यपी आणि हुल्लडबाजांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. यावर्षीसुद्धा अशा हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर असणार असून सायंकाळी साडेपाचनंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर शहरात साडे पाचशेपेक्षा जास्त पोलीस रस्त्यावर पाहायला मिळणार असून मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर विशेष करून कारवाईसुद्धा केली जाणार आहे.
12 ठिकाणी तपासणी नाके -
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी आणि कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 12 तपासणी नाके करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक वाहनधारकाची कसून चौकशी केली जाणार आहे. वेळप्रसंगी मद्यपान करून आलेल्या तळीरामांचे ब्लड सॅम्पलिंगसुद्धा करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली आहे.