कोल्हापूर - कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याची खबरदारी घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पाडल्या जातील, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आज कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत, त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याबाबत खबरदारी घेऊनच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मुंबईमध्ये ऑनलाइन परीक्षा घेताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी नियोजनपूर्वक या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. शिवाय, या परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण असणार नाही, असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
'डिस्टन्स एज्युकेशनची ऑनलाइन परीक्षा होती. त्याला दोन दिवस नऊ-नऊ हजार विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र, त्याच वेळी पाच लाख जणांनी हे पेज एकाच वेळी ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्राथमिक अहवालात विद्यापीठाची सिस्टीम डाऊन करण्याचा हा प्रयत्न होता, असे स्पष्ट झाले असून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा रीतसर गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला आहे,' असे मुंबई विद्यापीठात झालेल्या सायबर हल्ल्याबाबत त्यांनी म्हटले.
हेही वाचा - डाळीला महागाईचा 'तडका'; येत्या काही दिवसांत आणखी दर वाढण्याची चिन्हे