कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरला आल्यानंतर कसे स्वागत होणार हे पाहावे लागेल. विधानसभा निवडणुकीत दादांनी कोल्हापूर सोडून कोथरूड मतदारसंघ निवडला त्याचवेळी दादांवर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा दादा कोल्हापूरला येणार असल्याचे म्हणत आहेत. यावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातीलच असल्याचा टोला लगावला. कदाचित ते देवेंद्र फडणवीस यांना सांगत असावेत, असे देखील सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - DECADES 2010-20 : दशकातील केंद्र सरकारची वादग्रस्त विधेयके व त्यावरून देशात झालेली आंदोलने
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी अनेकवेळा अशा पद्धतीची वक्तव्य करून राज्यात चर्चेचा विषय तयार केला. आता पुन्हा एकदा मी कोल्हापूरला परत जाईन या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत आहे.
संस्था टिकतात सत्ता टिकत नसते
एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ईडी आणि सीबीआयचा कशा पद्धतीने वापर सुरू आहे हे संपूर्ण भारतानेच आता पाहिले आहे. आजपर्यंत अनेक चौकशी का झाल्या नाहीत? राजकीयदृष्ट्या हे कृत्य करणे वाईट आणि तितकेच दुर्दैवी आहे. संस्था टिकतात, सत्ता टिकत नसतात. त्यामुळे संस्थेवरचा विश्वास टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे सीबीआय आणि ईडीचे नेमके कामकाज काय हे देखील भविष्यात अधोरेखित होणे काळाची गरज असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचाच टक्का जास्त दिसेल
जिल्ह्यात जवळपास 400 हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर खरंतर लढल्या जातात. मात्र, त्या ठिकाणीसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनासुद्धा आपापले गड राखतील आणि महाविकास आघाडीचाच टक्का निकालामध्ये जास्त असेल, असा विश्वाससुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंवर भाजपची नाराजी; मनातला द्वेष लपवता येईल का?