कोल्हापूर - विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शनिवारी महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. येथील कसबा बावडा जवळच असणाऱ्या महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.
प्रचाराचे नियोजन पुढीलप्रमाणे -
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता इचलकंरजी येथे मेळावा होणार आहे.
-रविवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आजरा येथे मेळावा होईल.
- सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत कागल येथे मेळावा होईल. तसेच सायंकाळी 4 वाजता कोल्हापुरात प्रचार नियोजन
-मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जयसिंगपूर येथे मेळावा होणार आहे. याप्रकारे पुढील प्रचार मेळावे होणार आहेत.
हेही वाचा- राष्ट्रवादी देणार औरंगाबाद आणि पुणे पदवीधरमधून भाजपला तगडे आव्हान
चार पदे झाली होती रिक्त -
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाल्याने ही पदवीधरची जागा रिक्त राहिली होती. नागपूरमधून भाजपाचे सदस्य अनिल सोले यांचीही 19 जुलैलाच मुदत संपली होती, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण तसेच शिक्षक मतदारसंघापैकी पुण्यातील अपक्ष सदस्य दत्तात्रय सावंत, अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे यांचीही मुदत यादरम्यान संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.
दोन दिवसातच जाहीर होणार निकाल -
या पाच मतदारसंघात 1 डिसेंबरला मतदान होणार असून दोन दिवसांनी म्हणजेच 3 डिसेंबरला या पाचही जागांचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे.
हेही वाचा- पुणे पदवीधर निवडणुकीचे सांगली ठरणार रणांगण!