कोल्हापूर - कमी काळात जास्तीत जास्त पैसे मिळतील, असे अमिष दाखवून कोल्हापूरसह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना एका कंपनीने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. महारयत अॅग्रो इंडिया असे या कंपनीचे नाव सांगत आपली मोठी फसवणूक केली असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याबाबत स्वतः शेतकऱ्यांनीच आता पुढे येऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
कडकनाथ कुकूटपालनात गुंतवणूक करा आणि दुप्पट उत्पन्न कमवा या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जवळपास 500 कोटींचा हा घोटाळा असल्याचे आता समोर येत आहे. कोल्हापूरसह सांगली आणि महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एका युनिटसाठी 75 हजार रुपये भरून 200 कडकनाथ पक्षी देण्यात आले. कंपनीकडून प्रत्येक युनिटसाठी पक्षांचे खाद्य, वैद्यकीय तपासणी, औषधे आणि काही भांडी दिली जातात. जेव्हा काही महिन्यांनंतर या कोंबड्या अंडी द्यायला सुरुवात करतात तेव्हा पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50 रुपये प्रमाणे, दुसरी 2 हजार अंडी प्रतिनग 30 रुपये तर शेवटची साडे 3 हजार अंडी 20 रुपये या दराने कंपनी विकत घेते. पक्षी मोठे झाल्यावर 200 पक्षांमधील 120 पक्षी 375 रुपये प्रमाणे परत घेतले जातात. सगळे मिळून जवळपास पावणे दोन लाख रूपयांचा नफा केवळ एका वर्षात मिळवून देण्याची ही योजना आहे.
या योजनेसाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 8 हजारांहून अधिक जणांनी गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. थोडे दिवस सर्वकाही ठीक सुरू झाले. मात्र, काही काळानंतर कंपनीकडून पक्षांचा खाद्यपुरवठा बंद झाला. अंडी घ्यायचे बंद झाले. कोंबड्यांनी घातलेली अंडी ठेवायची कुठे हा प्रश्न सुद्धा अनेक गुंतवणूकदार शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अनेकांनी तर 10 ते 15 युनिटसाठी आपले पैसे गुंतवले आहेत. त्यांना एक पक्षीसुद्धा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार शेतकरी आता संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोन्याची अंडी देणारी गोष्ट आम्ही दंतकथेत ऐकले होते, पण 50 ते 60 रुपयांना कोंबडीचे अंड हे मी कधीच ऐकले नाही. राजकीय आश्रय असल्याशिवाय अशा फसव्या कंपन्या चालत नाहीत. शिवाय राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच ही फसवणूक झाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
या फसव्या आणि घोटाळेबाज कंपन्यांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार असल्याचेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. कंपनीचे सर्वेसर्वा सुधीर मोहिते यांनी याबाबत काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. काही कारणांमुळे कंपनी अडचणीत आली आहे. गुंतवणूकदार शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शिवाय मी कोणत्याही चौकशीसाठी सामोरे जायला तयार असल्याचेही म्हटले आहे.
आधीच शेतकरी विविध संकटांना तोंड देत आहेत, आत्महत्या वाढल्या आहेत, काही शेतकरी त्यातूनही स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशा जोडधंद्यांमध्ये गुंतवणूक करतात पण या महाठग कंपन्या शेतकऱ्यांना रस्त्यावर आणतात. त्यामुळे अशा कंपन्यांवर तात्काळ कारवाई होऊन आमचे पैसे परत मिळावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.