कोल्हापूर- करवीर निवसानी श्री अंबाबाई मंदिरातील भाविकांची संख्या पुन्हा एकदा मंदावली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवली आहे. दिवसांतून केवळ चारशे ते पाचशे भाविक श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येत आहेत, अशी माहिती देवस्थान समितीने दिली आहे. दरम्यान, भाविकांची वर्दळ कमी असल्याने मंदिर परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या एप्रिल महिन्यात सर्व धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आली होती. हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
सलग सुट्ट्या असूनही मंदिर शांतच -
वाढत्या कोरोना रुग्णांचा आलेख पाहता भाविकांनी देखील कोल्हापूरकडे पाठ फिरवली आहे. सलग सुट्ट्या असूनही कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील दर्शन रांग भक्ता विना ओस पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची भाविकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. मंदिर आवारात स्थानिक भाविकांची तुरळक गर्दी असल्याचे दिसून येत आहे. रात्रीची संचारबंदी व कडक निर्बंधांमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. आत्ता कुठे मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यवसायिक सावरले होते, पण पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या आणि प्रशासनाचे कडक निर्बंध, त्यामुळे व्यापारी पुन्हा एकदा धास्तावले आहेत. शिवाय पर्यटकांनी देखील पाठ फिरवल्यामुळे उपासमारीचे संकट पुन्हा एकदा निर्माण होईल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.