कोल्हापूर - जिल्ह्यात आजपासून पुढील 7 दिवस 100 टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील व्यवसाय 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. त्याचबरोबर दूध संकलन व त्याच्या वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. याबाबतचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.
सुधारित आदेशानुसार, सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. तसेच बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सींची कामे सुरू राहतील. दूध संकलन व वाहतूक सुरू राहणार असून, यामध्ये वेळेची मर्यादा असणार नाही. शिवाय ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापने तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत.
शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केली. सद्या जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 2200 हून अधिक झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती किंव्हा संस्थेवर साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नमूद केले आहे.