कोल्हापूर - महापालिका अंतर्गत येणाऱ्या उपनगरात व ग्रामीण भागात पाण्यासाठी पट्टीपाण्याचे राजकारण जोरात सुरू आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर होईल, यात शंका नाही. त्याचबरोबर उपनगरात बोगस नळ कनेक्शनने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी चोरट्यांना पकडून त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या कवेत चौदा गावे -
महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या हद्दवाढीच्या एक किलोमीटर परिघातील गावांच्या भूमी उपयोजनाच्या दृष्टीने विचार केल्यास शहराच्या पश्चिम, पूर्व व उत्तर दिशेला पाडळी खुर्द, बालिंगे, नागदेववाडी, शिंगणापूर, प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडिणगे, निगवे दुमाला, भुये, शिये, शिरोली, गांधीनगर, उचगाव, सरनोबतवाडी या चौदा गावांचा समावेश होतो. या गावांत बहुतांश क्षेत्र बारमाही ऊस आहे. याशिवाय कोल्हापूरच्या दक्षिणेकडील उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, वाडीपीर या पाच गावांतील बहुतांश जमीन पडीक, खडकाळ माळरान स्वरुपाची आहे. यात फक्त कळंबा तलावाशेजारील बारमाही ऊस पिकाखालील जमिनीचा अपवाद आहे. शहराचा विकास बघता याआधीच महापालिकेने या गावात नळकनेक्शन दिले आहे.
कोल्हापूर उपनगरात 'पट्टीपाना' ठरतोय महापालिकेच्या तिजोरीला मारक शहरी भागात १ लाख २३५८ नळकनेक्शन -कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिक्षेत्रात सुमारे १ लाख २३५८ कनेक्शन आहेत. त्यापैकी ए वॉर्डमध्ये घरगुती ३२ हजार ४३२, व्यावसायिक २३०, औद्योगिक ४१४, बी वॉर्ड मध्ये घरगुती १८ हजार ६०५, व्यावसायिक २४३, औद्योगिक १८१, सी वॉर्ड मध्ये ४ हजार २६५, व्यावसायिक १७८, औद्योगिक १२९, डी वॉर्ड मध्ये ५ हजार ७११, व्यावसायिक ५३, औद्योगिक ३४ व ई वॉर्डमध्ये ३५ हजार ७५९, व्यावसायिक ७४६ , औद्योगिक ५३३ अधिकृत नळ कनेक्शन आहेत. तर शासकीय विभागात घरगुती १०८, व्यावसायिक १५६ व औद्योगिक ७ अधिकृत नळकनेक्शन आहेत.
ग्रामीण भागात देखील नळकनेक्शन -महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी क्षेत्राला लागून असलेल्या १४ गावाच्या हद्दीत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात घरगुती २ हजार ५६९, व्यावसायिक १० व औद्योगिक ७ असे एकूण २ हजार ५८४ अधिकृत नळ कनेक्शन आहे.
बोगस नळ कनेक्शन आणि थकीत पाणी बिल धारकांवर कारवाई -कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकित असणाऱ्या पाणी बिलांवर मध्यंतरीच्या काळात मोठी कारवाई करण्यात आली. सर्वसाधारण सभेत बोगस कनेक्शन हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संयुक्तपणे मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सण 19 ते 20 या कालावधीत पाणी बिल थकीत असणाऱ्या आणि बोगस कनेक्शन असणाऱ्या जवळपास 991 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 3 कोटी 30 लाख इतका दंड वसूल करण्यात आला. तर सण 19 ते 21 या कार्यकाळात महापालिकेकडून 124 जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून एक कोटी ३१ लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव -मध्यंतरीच्या काळात सर्वसाधारण सभेत बोगस कनेक्शनचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई व्हावी, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. मात्र लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील लोकांनी बोगस कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास येताच, अधिकाऱ्यांनी कारवाई करू नये यासाठी त्यांच्यावरच राजकीय लोकप्रतिनिधींनी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारवाई करण्याचा मर्यादा अधिकाऱ्यांच्यावर येत आहेत.
महापालिकेची तिजोरी खाली -पाणीपुरवठामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला 70 ते 80 कोटीची भर पडत असते. मात्र थकबाकीदार आणि बोगस कनेक्शन धारक यांच्यामुळे महापालिकेची तिजोरी अद्याप खालीच आहे. पाणी वसुलीतून जवळपास 68 कोटी चे उद्दिष्ट महापालिकेचे आहे. त्यातील १८ कोटी थकीत रक्कम ही शासकीय आणि ३० इतर, नळकनेक्शन धारकांकडून थकीत आहे. तर आत्तापर्यंत 26 कोटी इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधीसह नागरिकांच्याकडे पट्टीपाना -अनेक लोकप्रतिनिधींनी मतदारांना खुश ठेवण्यासाठी आपल्या सोयीनुसार पाणी सोडण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. महापालिकेचे कर्मचारी सकाळी चार वाजल्यापासून प्रत्येक विभागात पाणी सोडण्याचे काम करत असतात. काही प्रभागात तीन तास तर काही प्रभागात पाच तास पाणी सोडले जाते. मात्र अनेक ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींनी स्वतःहून तयार केलेल्या पट्टी पाना घेऊन पाणी सोडले जाते. काही ठिकाणी नागरिकांनी देखील पट्टीपाना तयार करून आपल्या सोयीनुसार पाणी सोडण्याची यंत्रणा उभी केली आहे. याचा फटका देखील महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. उपनगरात हा प्रकार सर्वत्र पहायला मिळतो.
रात्रीस खेळ चाले -महापालिका क्षेत्रातील उपनगरात रात्रीचा खेळ सुरू झाल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पट्टी पाण्याने पाणी सोडून रात्रभर पाणी पुरवठा सुरू ठेवला जातो. काहीवेळा वादाचे प्रसंग देखील घडले आहेत. नुकतेच उपनगरात असणाऱ्या बोंद्रेनगर येथे रात्रीच्या वेळी पाणी सोडणाऱ्या नागरिकांना एका लोकप्रतिनिधीने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. महापालिकेने गस्तीचे प्रमाण वाढवून अशा पाणी चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे.
उपनगरात पुन्हा एकदा बोगस नळ कनेक्शनने काढले डोकेवर -महानगरपालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या उपनगरात पुन्हा एकदा बोगस नळकनेक्शन डोके वर काढले आहे. लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, फुलेवाडी रिंग रोड , क्रांतिसिंह नाना पाटील नगर, जिवबा नाना पार्क, कळंबा, पाचगाव, राजोपाध्ये नगर, राजेंद्र नगर याठिकाणी जवळपास साडे तीनशेच्यावर बोगस कनेक्शन असल्याचे माहिती सांगितली जाते. मात्र त्याची लेखी तक्रार महापालिका प्रशासनाकडे आले नसल्याने कारवाई केली जात नाही. शिवाय असे बोगस कनेक्शन निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
संयुक्तपणे सर्व्हे गरजेचा -मध्यंतरीच्या काळात बोगस कनेक्शन असल्याचा आरोप नगरसेवक यांच्याकडून झाल्यानंतर संयुक्तपणे शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मात्र पुन्हा एकदा बोगस कनेक्शनचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शोध मोहीम राबवून आशावर कारवाई करणे गरजेचे आहे.