कोल्हापूर - ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. विविध मागण्यांसह राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या विविध मागण्यांसाठी सर्व संघटना मिळून एकत्र झालेली राज्य एसटी कृती समिती 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे सणासुदीच्या काळात याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
कृती समिती स्थापन
कोरोनामुळे आर्थिक खाईत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे, असा आरोप आता सर्वच एसटी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याची तयारी ठेवली आहे. आज सर्व संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने आज राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाला आहे.
२७ ऑक्टोबरपासून उपोषण
विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीचा एल्गार पुकारला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महागाई भत्त्यात वाढ करावी, पगार वाढ करावी आदी मागण्यांसाठी ही कृती समिती आंदोलन करणार आहे. २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, ऐन सणासुदीला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.