कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेमार्फत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या वर्षी सुद्धा कोल्हापुरातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर याच स्मशानभूमीत महापालिकेमार्फत त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवेमुळे आपणही महापालिकेला हातभार लावला पाहिजे या हेतूने संबंधित रुग्णाचा मुलगा मदतीला पुढे आला आहे. शिवाय तो अनेकांना मदतीचे आवाहन सुद्धा करत आहे. पाहुयात 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट.
वडिलांच्या मृत्यूनंतर महापालिकेला हातभार लावण्यासाठी केल्या शेणी दान (गोवऱ्या)
गेल्यावर्षी 30 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या तुकाराम रामचंद्र पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्रीच्या दीड वाजता महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुधीर पाटील याने महापालिकेकडून होत असलेली ही मदत पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिली होती. त्यामुळे तेंव्हाच आपणही काहीतरी मदत करावी असे त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू होते. अंत्यविधीसाठी महापालिकेकडून 150 किलो लाकूड आणि 500 शेणी मोफत दिल्या जातात. महापालिकेचा यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पावसाळा सुरू असल्याने त्यांना शोधूनही शेणी सापडल्या नाहीत. मात्र पंचगंगा स्मशानभूमीसाठी मदत करायची हा विचार सुरूच होता. सध्या पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. महापालिकेवरील ताण पाहून एका ठिकाणाहून शेणी उपलब्ध झाल्या आणि त्यांनी 5 हजारांहून अधिक शेणी दान केल्या. शिवाय अनेकांना शेणी दान करण्यासाठी आवाहन सुद्धा करत आहेत. मित्रमंडळींना सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत.
'सर्वांनी हातभार लावला पाहिजे'
पंचगंगा स्मशानभूमी येथे दररोज 30 ते 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीवर प्रचंड ताण आहे. यासाठी महापालिकेकडून पैसेही घेतले जात नाहीत. त्यामुळे प्रत्येकानेच आपापल्या परीने आशा संकटाच्यावेळी मदत केली पाहिजे असे सुधीर पाटील यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा - पुण्यात कडक लॉकडाऊनची गरज नाही, न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणार - महापौर