कोल्हापूर - वीज बिल मागायला दारात याल, तर तेल लावलेलं पायताण हाय, अशा शब्दात कोल्हापूरकरांनी महावितरणला इशारा दिला आहे. शहरातील प्रत्येक चौकात असे फलक लावण्यात आले असून, वाढत्या वीज बिलाविरोधात कोल्हापूरकर मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा या फलकाच्या माध्यमातून मिळत आहे.
कोल्हापूरकरांचा महावितरणला इशारा -
वाढत्या वीज बिलविरोधात राज्यभरातील जनता, अस्वस्थ आहे. उर्जामंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा जनतेने चांगलाच धसका घेतला. पण, या धसक्याला न जुमानता कोल्हापूरकरांनी मात्र, वीज जोडणी तोडाल तर कोल्हापुरी पायताण खाल, असा सज्जड दम महावितरणला कोल्हापूरकरांनी भरला आहे. अशा आशयाचे फलक कोल्हापुरातील चौकाचौकात लावण्यात आले आहेत.
उर्जामंत्र्यांविरोधात जनतेत नाराजी
कोरोना काळात आलेल्या वीज बिलांमुळे जनतेची झोप उडाली आहे. उर्जामंत्र्यांनी वीज बिलात कोणतीही सवलत न देता बिलं भरावीच लागतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, कोरोनाकाळात हाताला नसलेले काम, व्यवसायात झालेली घट यामुळे वीज बिलात काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी राज्यभर होत आहे. या मागण्यांना केराची टोपली मिळाल्याने कोल्हापूरकर मात्र या विरोधात आक्रमक झाले आहेत. वीज बिल मागाल तर कोल्हापुरी पायताण खाल, अशा आशयाचे फलक कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे कृती समिती कोल्हापूरतर्फे लावण्यात आले आहेत.
वीज बिल कमी केले नाहीतर जनताच सरकारला जागा दाखवेल -
वीज जोडणी तोडायला येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद शंभर टक्के मिळेल. यासाठी कोल्हापुरी पायताण मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल कमी केले नाहीतर जनताच सरकारला त्यांची जागा दाखवेल, असे कोल्हापूर कृती समितीचे सदस्य बाबा पार्टे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महावितरणचा कोणीही कर्मचारी वीज बिल तोडण्यास आल्यास आपल्याशी संपर्क साधावा. यासाठी कृती समितीने आपले मोबाईल नंबरही जाहीर केले आहेत.
हेही वाचा - कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आता 'स्वाभिमानी'ची उडी
हेही वाचा - कोल्हापूर : ३ दिवसांत २४ हजार भक्तांनी घेतले अंबाबाईचे दर्शन