कोल्हापूर - मटका बुकीवर छापा मारायला गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविकेला महागात पडले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला आणि त्यांचे पती सलीम मुल्ला यांच्यासह गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्का( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कायद्याअंर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
आतापर्यंत हल्ल्यातील सहभागी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर अवघ्या २४ तासांत कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अवैध धंदा करणाऱ्यांना पोलीस कर्मचारी जर पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा सज्जड दम कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिला. आरोपींनी चोरलेले पोलिसांचे रिव्हॉल्वर आणि गोळ्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्व गुन्हेगारांना मोक्का लावणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी विशेष पोलीस महासंचालक संदीप वारके यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली. पोलीस महासंचालक यांनीही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय घडली होती घटना-
दोन दिवसापूर्वी कोल्हापूर शहरातील यादव नगर परिसरामध्ये असणाऱ्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचा पती सलीम मुल्ला याच्या जुगार अड्ड्यावर मटका सुरू होता. या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी छापा टाकला. घटनास्थळी पोलिसांना मटका आणि जुगाराच्या चिठ्ठ्या आणि रेकॉर्ड सापडले होते. तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कमदेखील मिळाली होती. यावेळी सलीम मुल्ला आणि सुमारे ५० हून अधिक जणांनी पोलिसांना विरोध करत मारहाण केली. या मारहाणीत प्रशिक्षणार्थी ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकाचे रिव्हॉल्वर चोरून त्यांच्याच अंगावर रोखले होते. या घटनेनंतर विरोध करणाऱ्या जमावाने बंदूक घेऊन पळ काढला होता.
चोवीस तासांमध्ये माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह २१ जणांना पोलिसांनी अटक केली होती. लक्षतीर्थ वसाहतमधून स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या निलेश दिलीप काळे, राजू यासीन मुल्ला, सुंदर रावसाहेब दाभाडे आणि जावेद मुल्ला यांना रिव्हॉल्वरसहित रात्री अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या २५ हून अधिक झाली आहे.