कोल्हापूर - अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तुल , काडतुसे आणि सोन्याचे दागिने असा 10 लाख 11 हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला आहे. राजू तुकाराम सुतार , (वय 28, रा लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर, मूळ रा. वैभववाडी, सिंधुदुर्ग) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने १० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात घरफोड्यानी धुमाकूळ घातला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहेत. पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असता जुना शिंगणापूर नाका येथून हातात पिशवी घेऊन जात असताना एक व्यक्ती निदर्शनास पडली. त्याला हटकले असता तो पळून गेला. त्याला दोघांनी पाठलाग करून पकडले असता त्याने राजू सुतार असे नाव असल्याचे सांगितले. त्याची पिशवी तपासली असता दोन कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, कात्री, कटर असे घरफोड्यासाठी वापरात आणले जाणारे साहित्य सापडले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने रंकाळा स्टँड जवळील गंभीर घरफोडी केल्याची कबुली दिली. राजू सुतार याला लहानपणापासून चोरी करण्याची सवय आहे. कोल्हापूर, सांगली, रायगड जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे 7 गुन्हे त्याच्या नावावर दाखल झाले आहेत.