कोल्हापूर- शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा तो झालेला नाही.कोल्हापूर शहरातील नागरिकांनी शासनाला वारंवार विनंत्या केल्या, आंदोलन केली तरी देखील शासनाने कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून शहराची एक इचही हद्दवाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून विकासासाठी आवश्यक निधी मिळत नाही. यामुळे आजपासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. हद्दवाढ कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले असून आज कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत शहराची हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका या वेळी कृती समितीने घेतली आहे. वेळ पडली तर शहराच्या हद्दवाढीसाठी रक्त सांडू पण शासनाला हद्दवाढ करायला भाग पाडू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
राजकीय इच्छाशक्ती आणि उदासीनता
कोल्हापूर पालिकेचे रूपांतर कोल्हापूर महापालिकेत १९७२ मध्ये झाले. मात्र त्यानंतर अद्याप देखील हद्दवाढ झालेली नाही. मुळातच शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची मानसिकता देखील हद्दवाढीच्या बाजूची नाही हे वारंवार दिसून येत असते. सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.मात्र हद्दवाढ होत नसल्याने आणि लोकप्रतिनिधीची या प्रश्नाकडे असलेली उदासीनतामुळे आर्थिक समस्येचा सामना महापालिकेला करावा लागत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन देखील वेळेत होत नाही. जर वेतनाला पैसे नाही तर विकासकामांची काय अवस्था असेल याची कल्पना यावरून आपल्याला करता येते.
पहिले हद्दवाढ मगच निवडणुका
महापालिका स्थापन होऊन 75 वर्षानंतर ही महापालिका हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे.यामुळे प्रथम हद्दवाढ करावी आणि त्यानंतरच निवडणूक घ्यावी,अंतिम प्रभाग रचना स्थगित करावी असा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवावा अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय, हद्दवाढ कृती व समन्वय समितीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे काल झालेल्या बैठकीत केली आहे.कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची चर्चा असून त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. महापालिकेच्या निवडणूकीबरोबर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु, हद्दवाढ न करता महापालिकेची निवडणूक घेतली गेली तर हेच कारण भविष्यात पुढे करुन हद्दवाढ पुन्हा रोखली जाईल म्हणून जोपर्यत हद्दवाढ होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका निवडणूक तसेच कोल्हापूर उत्तर ची निवडणूक होऊ देणार नाही असा इशाराच हद्दवाढ कृती समितीकडून देण्यात आले आहे.