कोल्हापूर - राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. राज्यात झालेल्या पावसामुळे रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह इतरत्रही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूरात पंचगंगेला आलेल्या पूरामुळे अनेक भागात घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी भरले होते. याचा मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसला आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुराचा फटका हा येथील कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांनाही बसला आहे. 2019 च्या महापुरातुन सावरतो न् सावरतो तोच आता यावर्षी सुद्धा महापुरात दुकान पूर्णपणे बुडाल्याने पुन्हा एकदा हे व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. मोठं कष्ट घेऊन हाताने तयार केलेली कोल्हापुरी चप्पल आता खराब झाल्याने पाटीमधून भरून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी कोल्हापुरी व्यावसायिक विलास शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, कोल्हापुरी आहेतच्या क्षणात होत्या झाल्या...
चप्पल व्यावसायिकाचे 5 ते 6 लाखांचे नुकसान -
कोल्हापुरातील वडणगे फाटा येथील जयहिंद हॉटेल समोर विलास शिंदे यांचे 'विवेक कोल्हापुरी चप्पल' नावाचं दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी याठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला आहे. दुकानात सर्व प्रकारची आकर्षक अशी कोल्हापुरी चप्पल मिळत होती. मात्र 2019 च्या महापुराचा त्यांना प्रचंड मोठा फटका बसला. त्यातून सावरून त्यांनी कर्ज काढुन पुन्हा नव्या उमेदीने आपला व्यवसाय सुरू केला. मात्र दुर्दैवाने यावर्षी सुद्धा महापुराने रौद्ररूप धारण केले आणि पुन्हा त्यांचं दुकान पूर्णपणे पाण्यात गेले. यामध्ये त्यांच्या दुकानातील एकही चप्पल आता वापरण्याच्या स्थितीत नाहीये. त्यामुळे त्यांना जवळपास 5 ते 6 लाखांचा फटका बसला असून यातून कसे बाहेर पडायचे असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
चप्पल पाटीत भरून फेकून देण्याची आलीये वेळ -
विलास शिंदे यांच्या दुकानात अगदी 20 रुपयांपासून 3 ते 4 हजारांपर्यंत किंमतीचे आकर्षक कोल्हापुरी चप्पल मिळायचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे डिझाईन असलेले कोल्हापूर ते गेल्या 3 वर्षांपासून याठिकाणी विक्री करत होते. मात्र, आता दुकानचं पुरात बुडाल्याने ते मोठ्या संकटात आहेत. आज सकाळपासून त्यांनी पुराचे पाणी ओसारल्यानंतर दुकानात येऊन स्वच्छतेला सुरुवात केली आहे. इतकी महागडी चप्पल अक्षरशः पाटीमध्ये भरून फेकून द्यावी लागत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे.
शासनाने काहीतरी मदत करावी -
सलग दुसऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमच्यावर मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आमच्यासह जिल्ह्यातील सर्वच पूरग्रस्तांना शासनाने काहीतरी मदत करावी अशी मागणी सुद्धा व्यावसायिक विलास शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा - पूर बाधितांना जागा दिली तरी स्थलांतर नाहीच, चिखलीतील गावकऱ्यांच्या आहेत अनेक समस्या