कोल्हापूर - एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनासमोरच्या चिंतेत वाढ होत आहे. अशातच जिल्ह्यातील 78 गावांमध्ये 45 वर्ष आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातल्या इतर गावांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पाहुयात कोल्हापुरातील लसीकरणाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट.
जिल्ह्यातील एकूण लसीकरणावर एक नजर
जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 31 लाख 26 हजार 917 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी 10 लाख 80 हजारांहून अधिक नागरिकांच्या पहिल्या डोसचे तर 4 लाखांहून अधिक नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 60 वर्षांवरील 78 टक्क्यांहून अधिक नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याने ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. यातील दुसरा डोस घेतलेल्यांची नागरिकांची टक्केवारी 45 टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सध्या प्राप्त डोसपैकी 90 टक्के लस ही दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी प्रधान्याने दिली जात आहे. त्यामुळे उपलब्ध डोसचे योग्य नियोजन सुद्धा केले जात आहे.
जिल्ह्यातील 78 गावांत 100 टक्के लसीकरण
लसीकरणामध्ये दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील 78 गावांमध्ये 45 वर्ष आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या 78 गावांपैकी 33 गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, 30 गावांत 5 पेक्षा कमी रुग्ण आहेत, 9 गावांत 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत तर 6 गावांत 10 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. या 78 गावांनी नियोजनबद्धरित्या प्रयत्न केल्यामुळे केवळ 244 इतके रुग्ण आढळून आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिव्यांगांसह, तृतीयपंथी आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही विशेष मोहिमेद्वारे लसीकरण
जिल्ह्यातील एकूण लसीकरणापैकी बाराही तालुक्यांमध्ये विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत 834 हून अधिक दिव्यांगांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या 164 विद्यार्थ्यांचे तर व्यवसाय नोकरीनिमित्त विदेशी जात असणाऱ्या 142 नागरिकांची लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातल्या 25 हून अधिक तृतीयपंथी व्यक्तींचे सुद्धा लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 ते 2 या वेळेत हा विशेष कॅम्प आयोजित केला जात असून त्याद्वारे लसीकरण केले जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाराही तालुक्यातील गरोदर माता लसीकरणासाठी सुमारे 68 हजार 348 इतके उद्दिष्टही आता प्राप्त झाले आहे. त्यांचेही योग्य नियोजनाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
मंगळवारी जिल्ह्याला 35 हजार डोस उपलब्ध
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डोस कोल्हापूरला मिळावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. मात्र त्या प्रमाणात जिल्ह्याला खूपच कमी प्रमाणात डोस उपलब्ध होत आहेत. काल मंगळवारी सुद्धा जिल्ह्याला केवळ 35 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये आजरा तालुक्याला 1300, भुदरगड तालुक्याला 1480, चंदगड तालुक्याला 2010, गडहिंग्लज तालुक्याला 2660, गगनबावडा तालुक्याला 380, हातकणंगले तालुक्याला 6660, कागल तालुक्याला 2050, करवीर तालुक्याला 5240, पन्हाळा तालुक्याला 2070, राधानगरी तालुक्याला 2130, शाहूवाडी तालुक्याला 1830 आणि शिरोळ तालुक्याला 3210 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेला 3080 डोस देण्यात आले असून त्यातील 400 डोस सीपीआर रुग्णालयाला आणि 500 डोस सेवा रुग्णालयाला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना आजपर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 916 वर पोहोचली आहे. त्यातील एक लाख 62 हजार 976 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत एकूण मृत्यूंची संख्या 5 हजार 130 वर पोहोचली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 810 इतकी आहे. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपासून दररोज 1 हजारांहून अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत तर दररोज 30 च्या आसपास रुग्णांचा मृत्यूही होत आहे.
हेही वाचा - राज्यात डेल्टा प्लसचा कोणताही नवा रुग्ण नाही - राजेश टोपे