कोल्हापूर - दोन दिवसापूर्वी कागल तालुक्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा हमिदवाडा, बेनिक्रे या परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या परिसरात पाहणी दौरा केला. शिवाय येत्या 7 दिवसात पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असे आश्वासन सुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजीपाला; कलिंगडचे अतोनात नुकसान -
यावेळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. काही भागात तर बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, की आपण काश्मीरमध्ये असल्याचाच भास यावेळी होत होता. या गारपिटीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात संबंधितांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसेवक तसेच तलाठ्यांना पंचनामे करून ते तहसीलदारांच्याकडे पाठवावेत तहसीलदारांनी तात्काळ ते राज्य शासनाकडे पाठवावे असे सांगत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य पद्धतीने पंचनामे करावेत, असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हंटले आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.