कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या शिव महोत्सवाला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. मात्र, संबंधित कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच जिल्ह्यातील अन्य पुरोगामी संस्थांनी विरोध दर्शवला होता. आता आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले आहे. इंदोरीकर यांना अहमदनगरवरून येण्यास वेळ लागणार असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे.
विरोध करणाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांना भेटून कार्यक्रम रद्द करण्याासठी निवेदन दिले. तसेच आयोजकांनी देखील कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. मात्र, इंदोरीकर महाराजांना इंदोरीहून कोल्हापुरात येण्यासाठी 9 तास लागतात. त्यामुळे केवळ वेळेअभावी हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच कोणाच्याही दबावाला बळी पडून कार्यक्रम रद्द केला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या 3 ते 4 महिन्यात पुन्हा दिमाखात कार्यक्रम भरवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यापीठासारख्या पवित्र ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या इंदोरीकरांचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका पुरोगामी संघटनांनी घेतली होती. यानंतर कोल्हापुरात वातावरण तापले होते. आता आयोजकांनी वेळेचे कारण देत संबंधित कीर्तन रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी एका कीर्तनादरम्यान इंदोरीकर यांनी स्त्रियांविषयी अजब दावा केला होता. तसेच महिलांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत होते. या भाष्यानंतर त्यांना विविध ठिकाणी महिलांच्या तसेच सामाजिक संस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. काही दिवसांनी इंदोरीकरांनी यासंदर्भात माफी पत्रक जाहीर केले होते.