कोल्हापूर - उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान टी -20 क्रिकेट सामान्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान सामन्याची अनेकांना उत्सुकता असते आणि त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय सामना पाहण्यासाठी उघड्यावर अथवा चौकामध्ये स्क्रीन लावू नयेत, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिला आहे.
हे ही वाचा - टी 20 वर्ल्डकपचा थरार मल्टिप्लेक्समध्ये अनुभवता येणार
पाकिस्तान सोबतचा सामना जिंकताच कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात मोठी गर्दीची परंपराच -
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची अवघ्या देशभरातील नागरिकांना उत्सुकता असते. कोल्हापुरातील नागरिक सुद्धा भारत पाकिस्तान सामन्याची वाटच पाहत असतात. शिवाय दोघांमधील सामना भारताने जिंकताच छत्रपती शिवाजी चौक येथे हजारोंच्या संख्येने क्रिकेट शौकीन एकत्र येत आनंदोत्सव साजरा करत असतात. त्यामुळेच गतवेळचा अनुभव पाहता आणि कोरोनाचा धोका पाहून अशी एकत्र येत गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी आज केले आहे. शिवाय नियमांचे उल्लंघन करून गर्दी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्याचा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे.