कोल्हापूर : महापूराशी सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांना कोरोना पासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. मात्र बुधवारी दिवसभरात ४४७ नवीन रुग्ण सापडले आहेत. महापुरात सर्वत्र पाणी असल्याने नागरिकांची गर्दी नव्हती. मात्र महापूर ओसारल्याने रस्त्यावर पुन्हा गर्दी होत आहे. त्यामुळे कोल्हापूरातील रुग्ण आणखी वाढू शकतात, असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
देशातील रुग्ण संख्या घटली तरीही जून महिन्यापर्यंत कोल्हापुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. राज्यात मृत्यू संख्येत तसेच नवीन रुग्णांमध्येही जिल्हा अग्रस्थानी होता. परंतु ग्राउंड लेव्हलला जाऊन वाढवलेले टेस्टिंग, कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि प्रशासनाची तत्परता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. तर गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार केल्यानंतर जिल्ह्यात महापूर परिस्थिती निर्माण झाली. एकीकडे महापूराची धास्ती वाढली आहे, पुन्हा एकदा कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या मात्र कमी होताना दिसत होती. जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 91 टक्क्यांवर गेले आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यामध्ये रुग्ण मृत्यूचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. आज घडीला जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ८३४ आहे, आत्तापर्यंत ५ हजार ३८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
टेस्टिंगचे प्रमाण सर्वाधिक :
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात दररोज पंधरा हजार पेक्षा जास्त टेस्टिंग केले जाते. सध्या महापुराच्या काळातही सहा हजारांहून अधिक जास्त टेस्ट होत असून पूरग्रस्त निवाऱ्याच्या ठिकाणीही प्रशासनामार्फत टेस्ट केल्या जात आहेत . त्यामुळे रुग्ण सापडतात त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यास मदत होत आहे
सध्या ऍक्टिव्ह संख्या आणि परिस्थिती
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 7834 इतके सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात 447 नवीन रुग्ण सापडले आहेत. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जवळपास नऊ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 447 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : पूरग्रस्त व्यवसायिकांची एकच मागणी, सरकारने मदत करावी