कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कमालीचा बदल जाणवत आहे. आज सकाळपासून सुद्धा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस ( heavy rain in kolhapur ) सुरू आहे. याचा शेतीवर परिणाम झाला असून ऊस तोडणी तसेच खरिपाच्या कापणी मळणीमध्ये सुद्धा अडथळा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले -
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी सुद्धा कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. शेतीची विविध काम कशी उरकायची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच काहीजण कामे उरकून घेत आहेत.
ऊस तोडणीवर मोठा परिणाम -
सध्या ऊस तोडणी हंगाम तेजीत सुरू आहे आणि या मध्येच नोव्हेंबर महिन्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ऊस तोडणी वरती याचा मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे शेतात पाणी साचून चिखल झाल्याने ट्रॅक्टर सुद्धा शेतात जाऊ शकत नाहीयेत. त्यामुळे अनेक ठिकाणची ऊस तोडणी पूर्णपणे बंद झाली आहे. आज सुद्धा सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातल्या शाहुवाडीतील आंबा-तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा मुद्देमाल लंपास