कोल्हापूर - गोकुळ दूध संघासाठी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, बैठकीमध्ये झालेल्या अनेक गोष्टी खाजगी स्वरूपाच्या असल्यामुळे त्या जाहीर करणार नाही, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुरू असलेल्या समझोता एक्सप्रेसच्या विषयावरून मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात हा खुलासा केला आहे.
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायला हवी -
या पत्रकात मंत्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यासह आमदार पी. एन. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील आम्ही तिघेही सत्तारुढ महाविकास आघाडीचे घटक आहोत. गोकुळ दूध संघासह इतर सर्व संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन त्या लढवाव्यात, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. यामध्ये संघर्ष झाला तर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, या प्रामाणिक भावनेतून एकत्र येण्याच्या माझ्या विनंतीस मान देऊन आमदार पी. एन. पाटील यांनी प्रतिसाद दिला आणि जवळपास चार बैठका झाल्या. सत्तेत ते असल्यामुळे ते किती जागा देतात, हीच मागणी मी सातत्याने केली असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हंटले आहे.
'इतके' उमेदवार देण्याची इच्छा असून ती बदलणार नाही -
पत्रकात पुढे म्हंटले आहे की, रविवारी जिल्हा बँकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये आमदार पी. एन. पाटील यांनी स्पष्टपणे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची चारच उमेदवार देण्याची इच्छा असून ती आम्ही बदलणार नाही, असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की कागलमध्ये तुम्हाला घेऊ व माजी आमदार के. पी. पाटील यांना एक जागा देऊ. यावर मी पालकमंत्र्यांचा विषय काढला. त्यावर त्यांनी एखादी जागा त्यांना देऊ, असे सांगितले. यावर मी जे काही भाष्य केले ते मी सार्वजनिक करणार नाही. मी चर्चा करून तुम्हाला कळवतो, असे सांगितले असल्याचेही मुश्रीफ यांनी पत्रकातून म्हंटले आहे.
पालकमंत्र्यांना भेटीची माहिती दिली -
शांतिनिकेतन स्कूलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन पी. एन. पाटील आणि माझ्यात झालेल्या भेटीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील संतप्त झाले व त्यांनी आपण यामध्ये येणार नाही. तुम्ही कोणाबरोबर जावयाचे तो निर्णय घ्या, असे सांगितले असल्याचे सुद्धा पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मते मिळाली नाहीत, असे सत्तारूढ संचालक मंडळाचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मल्टीस्टेट व गोकुळ दूध संघाच्या अनेक विषयावर आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना घेऊनच मला निर्णय घ्यावा लागेल, असेही मी आमदार पी. एन. पाटील यांचेसमोर अनेक बैठकांमध्ये स्पष्ट केले असल्याचे मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.