कोल्हापूर - चंद्रकांत पाटलांनी माझा अपमान केला होता. त्या विरोधात लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. वकिलांना सर्व कागदपत्र पुरवली असून लवकरच त्यांना नोटीस काढू, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे मुश्रीफ म्हणाले, की ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना धमकी दिल्याप्रकरणी मी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यांनी दिलेल्या धमकीवर मी आक्षेप नोंदवला होता. लोकशाहीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे असे वक्तव्य चालत नाही, असे देखील मुश्रीफ म्हणाले. मागच्या वेळी देखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्याबाबत लवकरच त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यासंदर्भातील वकिलांना सर्व कागदपत्रे दिलेली आहेत. लवकरच त्यांच्यावर नोटीस काढू असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी दिला.
परमवीर सिंग यांच्या विरोधात पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता परमवीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी बिल्डर देखील समोर येत आहेत. हे पोलीस आहेत की दरोडेखोर आहेत, हेच आता आम्हाला समजत नाही. या सर्व प्रकरणाची आता राज्य सरकार चौकशी करणार असून अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.