कोल्हापूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपाने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तसेच देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. याबाबत मी वारंवार बोलत आलो आहे. मात्र आता त्यांना प्राथमिक अहवालातून क्लिनचिट देण्यात आली आहे. खरंतर या सगळ्यामागे खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगच असून त्यांनाच आता गजाआड करा अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
'स्फोटके प्रकरणाला परमबीर सिंगच जबाबदार'
गेल्या सहा महिन्यांपासून मी वारंवार अनिल देशमुख निर्दोष आहेत याबाबत सांगत आलो आहे. मात्र आता तर ते खरे झाले आहे. खंडणीबाबत कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाहीये असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. याउलट परमबीर सिंग यांनीच वाझे यांना नोकरीत समावेश करून घेत मोठ्या पदाची जबाबदारी दिली. शिवाय ते सातत्याने वाझे यांना घेऊनच वरिष्ठ मंत्र्यांबरोबरच अधिकाऱ्यांकडे सुद्धा ब्रिफिंगसाठी जात होते. शिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती, त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंगच जबाबदार असल्याचेही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे निर्दोष असून त्यांना यामध्ये अडकवून त्यांना त्रास देण्यात आला, असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - राज्यातील नेत्यांवर ईडीचा 'वॉच' : अनेकांची कोट्यावधीची संपत्ती केली जप्त