कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच सणांच्या सार्वजनिक सेलिब्रेशनवर विरजण पडले आहे. अंबाबाई मंदिरात यंदा भक्तांविना शारदीय नवरात्रोत्सव पार पडणार असला तरीही उत्साहात कोणतीही कमी नाहीय. मागील 8 दिवसांपासून अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेची कामं सुरू झाली आहेत.
मंदिरांच्या स्वच्छतेनंतर आता देवीच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांची आज स्वच्छता करून त्याला झळाळी देण्यात आलीय. देवीच्या दागिन्यांच्या या मौल्यवान खजिन्यात रत्नजडित किरीट, हिर्याची नथ, मोहरांची माळ, कवड्यांची माळ, श्रीयंत्र हार, जडावाची मयूर कुंडले, सोन्याचा किरीट, 16 पदरी चंद्रहार, 84 मण्यांचा लफ्फा, मोरपक्षी अशा अनेक दुर्मिळ अलंकारांचा समावेश आहे.
याचप्रमाणे मंदिरातील गरुड मंडपात असलेल्या सुवर्ण पालखीची सुद्धा स्वच्छता करून त्याला चकाकी देण्यात आली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दरवर्षी हे दागिने झळाळी देण्यासाठी बाहेर काढले जातात. नवरात्रोत्सव काळातील 9 दिवस हे मौल्यवान दागिने वेगवेगळ्या दिवशी देवीला घातले जातात.