कोल्हापूर - जेवणामध्ये गुंगीचे औषध घालून कलाकारांना लुटल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. गाण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कलाकारांचे दागिने चोरले असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. येथील गंजी गल्लीजवळ असलेल्या एका यात्री निवासमध्ये आलेल्या 9 कलाकार प्रवाशांना रात्री जेवणातून गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. लातूरवरून हे कलाकार कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. त्या सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले असून चोरट्याने नेमका किती ऐवज चोरून नेला हे अद्याप समजू शकलेले नाही. सर्व प्रवाशी शुद्धीवर आल्यानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
रात्री जेवणातून गुंगीचे औषध
लातूर जिल्ह्यातील राचनवाडी गावातील काहीजण देवांच्या गाण्याचे कार्यक्रम करतात. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअपद्वारे संपर्क साधून कोल्हापुरात कार्यक्रमासाठी सुपारी दिली. अनामत रक्कम म्हणून संबंधित अज्ञाताने अडीच हजार रुपये सुद्धा दिले होते. त्यानुसार सर्व कलाकार काल रात्री कोल्हापूरला आले. त्या सर्वांची राहण्याची सोय येथील गंजी गल्लीमध्ये असलेल्या एका यात्री निवासमध्ये करण्यात आली. मात्र, त्या सर्वांना रात्री जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यामध्ये सर्वजण गाढ झोपी गेले. सकाळी यात्री निवासमधील खोली सोडायची वेळ निघून गेली तरी कोणी खोलीतून बाहेर आले नाही. यात्री निवास मालकाला शंका आल्यानंतर तपासणी केली असता सर्वजण गुंगीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुद्धा तत्काळ घटनास्थळी धाव घेत कलाकारांना येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यातील काहीजण शुद्धीवर आले असता त्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने लुटण्याच्या हेतूनच हे सर्व केल्याचे समोर आले.
प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती मिळत आहे. मात्र, चोरट्याने किती ऐवज चोरून नेला, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पहिल्यांदाच अशा विचित्र प्रकारे कोल्हापुरात प्रवासी कलाकारांना लुटण्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलीस संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे -
कुंताबाई कवरे, द्रौपदी म्हल्लारी सूर्यवंशी, कमाबाई महादेव कांबळे, सखुबाई पिराजी सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी, मसाजी चिंचोले, अशोक अंकुश भोरे, म्हल्लारी सूर्यवंशी अशी या कलाकारांची नावे असून सर्वजण लातूरमधील चाकूर तालुक्यातील राचनवाडी गावचे रहिवाशी आहेत.