कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. दर दिवशी 500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यामध्ये 15-20 रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे. बुधवारी दिवसभरात उच्चांकी 1195 रुग्णांची भर पडली आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृह सुद्धा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. कारागृहातील आणखी 40 जणांना कोरोनाची लागण झाली असून कारागृह प्रशासनाला याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सर्वच बंदीजनांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - आजरा नगरपंचायतीत राडा; कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकानेच कर्मचार्यांना टाकले कोंडून
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 8 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सर्व 65 कारागृहांमधील अधिकारी, कर्मचारी व कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेत विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार सर्वच कारागृहांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांचे स्वॅब तपासणीसाठी देऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कैद्यांचे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. गेल्या आठवड्यात कळंबा कारागृहातील तब्बल 37 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आता वाढ होऊन आज आणखी 40 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहात आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 82 वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 हजार 359 झाली आहे. 16 हजार 527 जण कोरोनामुक्त झाले असून 682 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात 6 हजार 150 रुग्णांवर उपचार सुरू होते.