कोल्हापूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या ध्वज स्तंभावर 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकणार आहे. कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड उद्यान येथे पाच वर्षांपूर्वी या ध्वजस्तंभाची ( Highest National Flag of Maharashtra Kolhapur ) उभारणी करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यानंतर यावर ध्वज फडकला नाही. वारंवार कोल्हापूर वासियांकडून या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवण्याची मागणी केली जात होती. मात्र सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आता 15 ऑगस्ट रोजी या ध्वजस्तंभावरती तिरंगा फडकणार आहे. याबाबतच्या कामाला आता सुरुवात झाली असून महाकाय क्रेनच्या माध्यमातून 'रोप लिफ्टिंग'चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
60 बाय 90 फूट इतक्या मोठ्या आकाराचा तिरंगा : 2017 मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या ध्वज स्तंभावर तिरंगा फडकवण्यात आला. 303 मीटर इतक्या उंचीचा हा स्तंभ आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार तसेच कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडला होता. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक मे 2017 रोजी याचे लोकार्पण सोहळा झाला होता. 60 बाय 90 अशा मोठ्या आकाराचा हा ध्वज आहे. त्यानंतर काही दिवस या दिवशी स्तंभावरती तिरंगा फडकविण्यात आला. मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे वारंवार याकडे दुर्लक्ष झाले. मात्र सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहीम सुरू आहे, अशातच देशातील दुसऱ्या सर्वात उंच असणाऱ्या या ध्वजस्तंभावरती तिरंगा फडकावा, अशी समस्त कोल्हापूर वासियांची भावना होती. याच भावनेचा विचार करून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार आज या कामाला सुरुवात झाली असून 15 ऑगस्ट रोजी या ध्वजस्तंभावरती तिरंगा फडकणार आहे.
हेही वाचा - Har Ghar Tiranga १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाचे नियम आहेत वेगळे