कोल्हापूर - नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हा महामार्ग शिये, भुये, भुयेवाडी, केर्ले, केर्ली, पडवळवाडी आदी गावातून जात आहे. या महामार्गाच्या भूमीसंपादनाच्या नोटीस तसेच मोजणी नोटीस या गावातील शेतकऱ्यांना लागू केल्या आहेत. गावातील 400हून अधिकांनी यावर हरकती नोंदविल्या, मात्र शेतकऱ्यांच्या हरकतींवर कोणतीही सुनावणी न घेता, कोणतेच उत्तर न देता राष्ट्रीय महामार्गाची मोजणी सुरू आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर प्राप्त मोजणी नोटिसांची होळी करत सरकारचा निषेध केला. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारासुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
'महापुराचा धोका अधिक वाढणार'
नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा येथील महापूर क्षेत्रातून जात आहे. ज्या ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे, त्या जागी 2019 आणि यावर्षी 2021मध्येसुद्धा 10 ते 20 फूट इतके महापुराचे पाणी होते. हे क्षेत्र सगळे पूरप्रवण क्षेत्र असूनसुद्धा या भागातून हा रस्ता जात आहे. हा रस्ता झाल्यानंतर या गावांसह कोल्हापूर शहराला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेळीच संभाव्य धोका ओळखून हा प्रस्तावित महामार्ग रोखणे महत्त्वाचे असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
'जाणीवपूर्वक लांबीचा मार्ग काढला'
प्रस्तावित महामार्ग हा हातकणंगले, वडगाव, वाठार, बोरपाडळे आणि पुढे रत्नागिरी असा जवळचा मार्ग असताना सुद्धा शियेमार्गे का केला जात आहे, असा सवालसुद्धा शेतकऱ्यांनी उपस्थित केला. रस्ते महामंडळाने जाणीवपूर्वक लांबीचा मार्ग का काढला, याचे उत्तर हवे असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. लांबून काढलेल्या या महामार्गामुळे इंधनसुद्धा जादा लागणार आहे. शिये, भुये, भुयेवाडी, केर्ले, केर्ली, पडवळवाडी आदी गावातील तब्बल 400 शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शिवाय अनेक बोअरवेल, झाडे, विहिरी अशा राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार असून याला आमचा ठाम विरोध असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या महामार्गाची प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने सुरू असून आम्ही याबाबत हरकती घेतल्या असून या हरकतींवर सुनावणीसुद्धा न घेता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे, याचा निषेध सुद्धा करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.