कोल्हापूर - रेमडेसिविर इंजेक्शनमधील काळाबाजार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आता एका नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. अनेक रुग्णालयातून नातेवाईकांनाच इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले जात होते. अनेकांना मिळत होते तर काहींना त्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. काहींकडून मोठ्या प्रमाणात पैशांची लूट होत होती. या सर्व धावपळीच्या दरम्यान आणि वेळेत इंजेक्शन मिळाले नसल्याने रुग्ण दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. त्यामुळे याचे संपूर्ण कंट्रोल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नियंत्रण कक्षाकडे दिले आहे. या निर्णयाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून स्वागत केले जात आहे. शिवाय नियंत्रण जरी दिले असले तरी पुन्हा नातेवाईकांना इंजेक्शनसाठी सर्वत्र फिरावे लागणार नाही ना याचीही काळजी घ्यावी अशी अनेकजण मागणी करत आहेत.
आता साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष, रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी कक्षाकडे करावी लागणार :
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांनी मेडिकल प्रोटोकॉलनुसार तपासून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडेच करायची आहे. वैयक्तिक नागरिक किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी या इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे करू नये, शिवाय त्यांची मागणी स्वीकारली जाणार नाही असेही म्हंटले आहे. त्यासाठी खाली प्रमाणे काही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत त्यावर एक नजर -
1) सर्व कोव्हिड रुग्णालय आणि कोव्हिड केअर सेंटरने रेमडेसिवीर इंजेक्शनची लेखी स्वरूपात जिल्हा नियंत्रण कक्षाकडे मागणी करायला लागणार आहे. या केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय अधिकारी यांच्याशी चर्चा करून ती मागणी स्टॉकीस्टकडे देऊन त्यानंतरच स्टॉकीस्टने थेट कोव्हिड हॉस्पिटलला याचा पुरवठा करावा लागणार आहे.
2) रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादकांनी स्टॉकीस्ट यांना पुरवलेल्या इंजेक्शनबाबतची माहिती स्टॉकीस्ट आणि कंपन्यांनीही नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक आहे.
3) पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शन केवळ आवश्यक असलेल्या रुग्णांना द्यायचे आहे. त्यामध्ये कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.
4) स्टॉकीस्ट यांनी एका दिवशी एकाच कंपनीचे इंजेक्शन संबंधित हॉस्पिटलला द्यावे. शिवाय एकाच रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात पुरवठा न करता सर्वच रुग्णालयातील मागणी विचारात घेऊन पुरवठा करण्यात यावा.
5) नियंत्रण कक्षाकडे प्राप्त तक्रारी आणि हॉस्पिटलकडून झालेल्या मागणीच्या नोंदी ठेवणे बांधनकारण.
6) रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आवश्यकतेनुसार राहील याची जबाबदारी नियंत्रण कक्ष प्रमुखाची राहणार आहे.
7) संपर्कासाठी पुढील क्रमांक देण्यात आले आहेत - 0231 - 2659232, 2652950, 2652953, 2652954, टोल फ्री क्रमांक - 1077 आणि व्हॉट्सअप क्रमांक - 8275121077
★कालपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात झाला होता त्रास :
कालपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत होती. अनेकांनी साठेबाजी केल्यामुळे ही टंचाई भासत असल्याचं काहींनी म्हटले होते. त्यामुळे काही रुग्णालयांकडून नातेवाईकांनाच इंजेक्शन उपलब्ध करायला सांगितले जात होते. नातेवाईक सुद्धा शंभर जणांना फोनाफोनी करून इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपडत होते. काहींना इंजेक्शन मिळायचं तर काहींना मिळत नव्हतं या सगळ्या दरम्यान, इंजेक्शन न मिळल्याने काहीं रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे म्हंटले जाते. मात्र या सर्वांवर लक्ष असावे यासाठीच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून यावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे नातेवाईकांना इंजेक्शनसाठी इतरत्र फिरत बसावे लागणार नसून साठेबाजी करणाऱ्यांवरही आता लक्ष राहणार आहे. त्यामुळे याचे नातेवाईकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेच शिवाय नियंत्रण कक्षाने सुद्धा कोणाला इंजेक्शनसाठी त्रास होत नाहीये ना याचीही खबरदारी घ्यायला हवी अशी मागणी होत आहे.
★ साथीच्या आजारात केमिस्ट लोकांनी सुद्धा जनतेची सेवा म्हणूनच काम करावे :
आपत्तीजनक काळात सर्वच केमिस्ट आणि मिडीकल व्यवसायाशी निगडित लोकांनी जनतेची सेवा म्हणूनच काम केले पाहिजे. जे कोणी यादरम्यान लूट करत असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी मात्र जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांचे आशा लोकांमुळे नाव खराब होत आहे. कोरोना काळात अनेक केमिस्ट लोकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही काही घोटाळा करतोय हे कृपया पसरवू नका अशी मेडिकल असोसिएशनचे माजी संचालक आणि नगरसेवक महेश सावंत यांनी म्हंटले आहे. शिवाय ज्यांनी या व्यवसायाकडे सेवा म्हणून न पहाता केवळ गोरखधंदा म्हणून करत आहेत अशा सर्वांचाच निषेध व्यक्त करत असल्याचेही सावंत यांनी म्हंटले आहे. एव्हढेच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकही औषध व्यावसायिक चुकीचे काम करणार नाही याची ग्वाही सुद्धा महेश सावंत यांनी दिली.
हेही वाचा - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवा, छगन भुजबळांचे नरेंद्र मोदींना पत्र