कोल्हापूर : एकीकडे राज्यात ईडी कारवाईवरून सातत्याने राजकारण तापलेले पाहायला मिळत असते. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी सामान्य जनतेलाच ईडी चौकशी लागेल असा इशारा दिला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत ऑनलाईन पैसे वाटले जातील आणि ते जे कोणी घेतील त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागेल. आपल्याकडे पैसे आले तर कुठून आले? कोणी दिले आणि देणाऱ्यांनी कुठून गोळा केले याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल. त्यामुळे आम्ही पक्क्या माहितीनुसार याबाबत ईडीला पत्र देणार असून, मतदारांनो सावध व्हा अन्यथा चौकशी अटळ असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील : चंद्रकांत पाटील नेहमीच आपल्या विविध वक्तव्यांवरून चर्चेत असतात. आज सुद्धा त्यांनी थेट मतदारांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागू शकते असते म्हटले आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, 'या निवडणुकीत केवळ विकासाच्या दिशेने घेऊन चाललो असलो तरी महाविकास आघाडीचे नेते हे सर्व वैयक्तिक पातळीवर घेऊन चालले आहेत. दोन दिवसांपूर्वी मी बोललो होतो, एका शिक्षण संस्थेची मुलं घरोघरी जाऊन एक फॉर्म भरून घेत आहेत. त्यामध्ये लोकांची सर्व माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये नाव, फोन नंबर, बँक नंबर आदी माहिती घेतली जात आहे. पण त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे. मात्र, मला पक्की माहिती मिळाली असून, मतदारांना Paytm द्वारे पैसे पाठविण्याची पूर्व तयारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे. जर आपल्या अकाऊंटवर असे पैसे आले तर आपल्याला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. हे पैसे कुठून आले, कोणी पाठवले सर्व चौकशी केली जाऊ शकते. त्याबाबत आम्ही आजच ईडीला पत्र देत असून फार मोठ्या रक्कमेने लोकांच्या अकाउंटवर paytm द्वारे पैसे ट्रान्सफर होणार आहेत, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे. शिवाय 1 हजारांच्या मोहापाई मतदारांनो आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीचा प्रचार शिगेला : दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात आहेत. येत्या 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून, आरोप प्रत्यारोपानंतर आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे इथलं राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी विरोधात भाजप मैदानात असले तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांची खरी प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.