कोल्हापूर - दीपावली म्हंटले की रंगीबेरंगी तसेच लहान मोठे आकाशकंदील आपल्या डोळ्यासमोर येतात. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकपासून बनवलेले आकाशकंदील बाजारात पाहायला मिळतात. मात्र, यावरच पर्याय म्हणून कोल्हापुरातील दोघी मैत्रिणींनी एकत्र येत साडीपासून रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदील बनवले आहेत. त्याला बाजारात मागणीही प्रचंड आहे. कोण आहेत या महिला, कशापद्धतीने त्यांनी हे आकाशकंदील बनवले आहेत, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून...
- आकर्षक साडीचे रूपांतर आकाशकंदीलमध्ये :
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील सुलक्ष्मी संस्थेच्या माध्यमातून सुमित्रा खानविलकर काम करत आहेत. याच संस्थेच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असा संदेश देत विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याला श्रुती पुंगावकर यांच्यासह काही मैत्रिणींची साथ मिळाली असून, आता दिपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पर्यावरणपूर्वक साडीपासून आकाशकंदील बनवले आहेत. दिसायला आकर्षण असणाऱ्या या आकाशकंदीलला आता प्रचंड मागणी आहे. सण साजरा करत असतानाच पर्यावरणालासुद्धा कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे.
- बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे आकाशकंदील :
दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत प्लास्टिकचे आकाशकंदील पाहायला मिळतात. यावर्षीही विविध ठिकाणी रंगीबेरंगी प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर यासाठी होतो. त्यामुळे पर्यावरणाला याचा धोका असल्याचे म्हणत कोल्हापुरात सुमीत्रा खानविलकर आणि श्रुती पुंगावकर यांनी मिळून गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी साडीपासून आकाशकंदील बनवण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्या दरवर्षी शक्य तितके आकाशकंदील बनवत आहेत. दिसायला आकर्षक असलेल्या त्यांच्या या आकाशकंदीलांना बाजारात प्रचंड मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- भविष्यात महिलांना रोजगार मिळेल अशा दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवणार :
सध्या सुमीत्रा खानविलकर आणि श्रुती पुंगावकर या काही मैत्रिणींसोबत मिळूनच हे आकाशकंदील बनवत आहेत. 400 रुपयांपासून 1 हजारांपर्यंत त्यांनी या आकाशकंदीलची किंमत ठेवली होती. त्यासाठी आकर्षक साड्या, बाजारात मिळणारे विविध रंगीबेरंगी धागे, काचेचे खडे, तसेच विविध डेकोरेशनच्या वस्तूंचा वापर करून त्यांनी हे आकाशकंदील बनवले आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कोणत्याच गोष्टींचा यामध्ये वापर करण्यात आला नाही. सद्या काही मैत्रिणी मिळून हा व्यवसाय करत आहेत. भविष्यात अनेक महिलांना रोजगार मिळेल आणि यातून पर्यावरणाच्या संरक्षणाचा एक सामाजिक संदेशसुद्धा जाईल, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवणार असल्याचे दोघींनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा - कोल्हापूरची पोरं 'लै भारी'; दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम