कोल्हापूर - कोल्हापूरात ( Kolhapur Rain) पावसाचा जोर चांगलाच वाढला असून 8 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा ( Heavy Rain ) इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील राजाराम बंधारासुद्धा सायंकाळी पाण्याखाली गेला. सद्यस्थितीत राजाराम बंधाराची ( Rajaram Dam ) पाणी पातळी 17.5 फुटावर आहे. त्यामुळे हा बंधारा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी; अतिवृष्टी काळात धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळा- जिल्हाधिकारी
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी आज दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथून 2 मिनीबस व 8 कार मधून अंदाजे 70- 80 पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी 5 वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरुप बाहेर पडली आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते. अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक सुरळीत - दरम्यान, सायंकाळी खारेपाटण गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात गगनबावड्याच्या अलीकडे 5 किलोमीटर अंतरावर दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जेसीबीसह पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.
दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस अद्याप देखील थांबलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता ( torrential rain ) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच गांभीर्य लक्षात घेत मुंबई व मुंबई उपनगरासह कोकण किनारपट्टीच्या भागात ( NDRF )च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत 5 टीम तैनात - दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा - Heavy Rain In Mumbai : मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश