कोल्हापूर - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर उद्या (सोमवारी) स्वतः भाजपा नेते किरीट सोमैया कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांना आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस पाठवत कोल्हापूरला न येण्याचे आदेश दिल्याची सोमैया यांनी माहिती दिली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत सोमैया यांनी कोल्हापूरला जाणार असल्याचे म्हटले आहे. मात्र आता या नोटीसनंतर मुंबईमध्ये सोमैया यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असून त्यांचा दौराही थांबविण्यात येत असल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे.
सोमैया यांच्या जीवास संभाव्य धोका ओळखून जिल्हा बंदी
किरीट सोमैया यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस पाठवून उद्या (सोमवारी) कोल्हापूरमध्ये येण्यासाठी प्रवेश बंदी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांना मिळालेल्या नोटीसमध्ये संभाव्य परिस्थिती ओळखून त्यांना कोल्हापूर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात गणेश विसर्जन सुरु आहे. जिल्ह्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा पुरवता येणे शक्यता नाही. त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांच्या जीवितास संभाव्य धोका असल्याचे ओळखून आणि संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान, या नोटीसनंतर सुद्धा सोमैया यांनी आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशाला बंदी असून आम्हाला केवळ कोल्हापूरमध्ये अडवू शकतात, मात्र आता माझ्या घराबाहेरच पोलीस बंदोबस्त असल्याने बाहेर पडायला सुद्धा मज्जाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सोमैया कोल्हापूरला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - अटकेसाठी पोलीस घरी पाठविल्याचा सोमैयांचा आरोप; दरेकर म्हणाले, हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न