कोल्हापूर - 'धनगर सारा एक' असा नारा देत आज कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद पार पडली. राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ७० वर्षे समाजाचा उपयोग करून घेतला. मात्र, आता हे होऊ देणार नाही, असे माजी आमदार राम शिंदे परिषदेनंतर आलेल्या पत्रकार बैठकीत म्हणाले.
या परिषदेत पुन्हा एकदा राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने आंदोलनाची दिशा ठरली नाही. मात्र पुढील परिषदेत तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात येईल. त्यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी दिला.
हेही वाचा - हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी - छगन भुजबळ
धनगर समाज 27 वर्ष झगडत आहे. आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. त्यांनी आरक्षण दिले, पण आजदेखील धनगर-धनगडमुळे आजदेखील समाज पिचत आहे. राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासने दिली, पण राज्यकर्त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका माजी आमदार राम शिंदे यांनी केली. आता केवळ आरक्षण दिले पाहिजे. तुमची चर्चा, आश्वासने नकोत. तुमची थोतांड चर्चा बंद करा, आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा माजी आमदार शिंदे यांनी दिला.
मराठा आरक्षणाची गोलमेज परिषद कोल्हापूरात झाल्यानंतर आज अक्षता मंगल कार्यालय येथे धनगर आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेला राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, राम शिंदे, कल्लाप्पाण्णा गावडे, बबनराव राणगे, आयोजक संदीप कारंडे, विष्णू माने, सुरेश कांबळे, नागेश पुजारी, संतोष शिंदे, अनिल कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोलमेज परिषदेत झालेले ठराव
- राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजातील आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणी आंदोलन करावे
- पुन्हा गोलमेज परिषदेची व्यापक बैठक घेण्यात येईल
- शेळ्या-मेंढ्याच्या संगोपनासाठी राज्य सरकारने या व्यवसायासाठी प्रोत्साहन व संरक्षणाची हमी द्यावी
हेही वाचा - सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत?