कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या दहीहंडीपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीची दरवर्षी प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, सलग तिसऱ्या वर्षी ही दहीहंडी रद्द करावी लागली आहे. 2019 वेळी आलेल्या महापुरानंतर दहीहंडी रद्द करून स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेसह आयोजनावरील खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली होती. गतवर्षी कोरोनामुळे दहीहंडी रद्द करण्यात आली आणि आता यावर्षी सुद्धा कोरोना आणि महापुरामुळे दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी स्पर्धेची बक्षिस रक्कम 3 लाख रुपये शिवाय स्पर्धा संयोजनासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेतून यावर्षी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला आहे.
महाडिक युवाशक्तीची सामाजिक बांधिलकी -
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटले की, कोल्हापूरवासियांना आठवते ती धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हजारो तरुणांच्या साक्षीने आणि डीजेच्या तालावर क्षणाक्षणाला वाढत जाणारी चुरस तसेच दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी अवघे कोल्हापूरकर गर्दी करत असतात. या दहीहंडीच्या संयोजनावर लाखो रुपये खर्च होतात. मात्र, कोरोना आणि महापुरामुळे मागील दोन वर्षांपासून दहीहंडी रद्द करावी लागली. यावर्षी सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. मात्र महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी यावर्षी सुद्धा स्पर्धेची बक्षीस रक्कम 3 लाख आणि संयोजनावरील खर्च होणारी सर्व रक्कम मदत म्हणून पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
दहीहंडीच्या निधीची रक्कम पूरग्रस्तांना -
लवकरच जिल्ह्यातील विविध भागातील पूरग्रस्तांना या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे. एकीकडे दहीहंडी रद्द करावी लागते याचे दुःख असून दुसरीकडे मात्र आपत्तीच्या वेळी आपणच नागरिकांच्या मदतीला धावून जायला हवे म्हणत या रक्कमेतून पूरग्रस्तांना मदत करता येणार असल्याचे समाधान सुद्धा असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पुढच्या वर्षी त्याच जल्लोषात आणि उत्साहात दहीहंडी साजरी करता यावी अशी प्रार्थना सर्वांनी केली आहे, असे महाडिक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले