कोल्हापूर - छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा भाजपाला अधिकार काय आहे? ज्या तात्विक मनुवाद्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहले, त्याचे पुस्तक जाळून टाका. तुमचे मनुवादी आदर्श तपासून घ्या? मगच नामांतराचा विषय घ्या, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
'छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही'
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरू गोळवलकर यांच्या पुस्तकाचे जोपर्यंत दहन करत नाहीत, तो पर्यंत भाजपाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. तुमचे तात्विक आदर्श तपासून घ्यावेत, वर्षानुवर्षे भाजपा संभाजीनगरच्या नावाखाली राजकीय पोळ्या भाजत आहे. त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही सत्तेत असताना हे का घडले नाही? असा सवाल त्यांनी केला.
'औरंगाबाद नामांतराचा निर्णय सहमतीने'
राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आहे. केवळ निवडणुकीपुरते नामांतराचा विषय पुढे येता कामा नये. या मुद्द्याचा सरकारवर काय परिणाम होणार नाही. हा विषय औरंगाबादपुरताच मर्यादित आहे. तीन पक्षांची समनव्य समिती नामांतराबाबत निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
'वज्रमूठ केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे भाजपा मूठभर'
शेतकऱ्यांच्या मुद्यावर मोदी सरकार उदासीन आहे. भाजपा नेत्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हीन भाषेत संभावना केली. त्याचा रेटा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चालवला. दिल्लीतील आंदोलन हे मूठभर आंदोलन आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले. पण ध्यानात ठेवा, हे मूठभर शेतकरी नाहीत तर शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे. आता त्यांच्यासमोर भाजाप मूठभर राहण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांना झालेय काय? कोणत्या मानसिकतेत ते राहतात. कोकणात दाते, गाडगीळ आणि इथे चंद्रकांत पाटील यांना पाहायला मिळाले. मनुवादी हीच संघाची मानसिकता आहे. संविधान ठिकाणी यांना मनुस्मृती हवी आहे. शेतकऱ्यांना नक्षलवादी, खलिस्तानवादी म्हणणारी मनुवादी वृत्ती हीच आहे. त्याचा आम्ही विरोध करतो, अशा शब्दात सावंत यांनी रोष व्यक्त केला.
'चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी'
पदवीधर निवडणुकीच्या मतदानावर आक्षेप घेणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था ड्रॉनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा जे. पी. नड्डा यांच्यासमोर करताना त्यांना नाकीनऊ आले असेल. जेथे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तिथे भाजपा नेस्तनाबूत झाला. त्यामुळे भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.