कोल्हापूर - भाजप सरकारने जसं जिओ आणलं आणि बीएसएनएल अडचणीत आली, तसेच नव्या शेतकरी कायद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे मंत्री पाटील म्हणाले, आज महात्मा गांधी यांची जयंती, त्यांच्या विचाराला हरताळ फासण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. नवे शेतकरी घोरण, कामगार धोरण आणून त्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. हे होऊ नये यासाठी भाजपने हे कायदे मागे घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. राज्यात हा कायदा लागू होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
नव्या कृषी व कामगार कायद्याविरोधात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापूर शहरातल्या पापाची तिकटी परिसरात आज काँग्रेसच्यावतीने भाजपच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ, नवे शेतकरी धोरण व कामगार कायद्याविरोधात आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजप हटाव देश बचाओच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या.