कोल्हापूर - 'बर्ड फ्ल्यू'च्या अफवेचा कोल्हापूर जिल्ह्यातील चिकन विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे. 4 दिवसांपूर्वी जवळपास 160 रुपयांपर्यंत चिकनचे दर होते. ते आता 90 रुपयांच्या सुद्धा खाली उतरले आहेत. कोल्हापूरात कोणत्याही प्रकारे बर्ड फ्ल्यूचा शिरकाव अद्याप झाला नाहीये. त्यामुळे अशा कोणत्याही अफवेवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन चिकन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे. शिवाय शासनाने आम्हाला विक्री बंद करायला सांगितल्यानंतर आम्ही तत्काळ व्यवसाय बंद ठेऊ, असेही सर्व विक्रेत्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरात मोठ्या संख्येने चिकन विक्रेते आहेत. मटनाबरोबरच चिकन खाणाऱ्यांची संख्या सुद्धा कोल्हापूरात प्रचंड आहे. 4 दिवसांपूर्वी याच चिकनचे दर जवळपास 160 ते 180 रुपये किलो इतके होते. काही ठिकाणी तर चिकनचे दर 200 पर्यंत पोहोचले होते. मात्र जसजसा महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू दाखल झाला, तसा चिकन विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापुरात तर अफवाच पसरल्याने इथल्या विक्रेत्यांना चिकन 80-90 रुपये किलो दराने विकावे लागत आहे.
हेही वाचा - 'घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार?'
कोल्हापूरात केवळ अफवा; लोकांनी चिकन खाण्याचे आवाहन
देशासह राज्यात बर्ड फ्ल्यू दाखल झाला असला तरी कोल्हापूरात अशी एकही घटना अद्याप समोर आली नाहीये. त्यामुळे विक्रेत्यांना नाहक त्रास होत असून पडलेल्या दारात आता विक्री करावी लागत आहे. कोल्हापूरात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे, असे जेव्हा कोल्हापूर प्रशासन जाहीर करेल, तेव्हा आम्ही सर्वजण स्वतः व्यवसाय बंद ठेऊ, असे इथल्या चिकन व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिवाय यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आम्ही प्रशासनाचे सर्व नियम पाळत आलो आहे, यापुढेही पाळू, असे आश्वासन या विक्रेत्यांनी दिले असून नागरिकांनी चिकन खावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाने आधीच संकटात त्यात हे नवं संकट
कोरोनामुळे आधीच आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वजण आर्थिक संकटात आहेत. मात्र काही लोकांनी पसरवलेल्या अफवेचा आम्हाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अशा अफवा कोणी पसरवू नये, असे शासनाने यापूर्वीच आवाहन केले आहे, शिवाय या विक्रेत्यांनी सुद्धा 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून केले आहे.
'बर्ड फ्ल्यू' धास्तीनेही चिकन विक्रीत घट
काही नागरिकांनी कोरोना नंतर आता 'बर्ड फ्ल्यू'ची सुद्धा धास्ती घेतली आहे. त्यामुळे चिकन विक्रीत मोठी घट झाल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काही ग्राहक मासे खाण्याकडे सुद्धा वळले आहेत. तर, काहींनी शाकाहारी खाणेच पसंत केले आहे. मात्र अद्याप कोल्हापूर जिल्ह्यात अशी काहीही घटना घडली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत काही अधिकृत समजत नाही तोपर्यंत नागरिकांनी चिकन खावे, असे विक्रेत्यांनी सुद्धा म्हटले आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी जंजिरा गडावरील निर्बंध उठवले, किल्ला पर्यटनास खुला