कोल्हापूर - गेल्या सत्तर दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू आहे. शासनामध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी हे प्रत्येक डेपोसमोर बसून उपोषण करत आहेत. मात्र, यावर सरकार मात्र काही तोडगा काढत नसल्याने संप दिवसेंदिवस वाढत आहे. तर, दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांचे पगार देखील न झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil comment on st employee strike ) यांनी आज कोल्हापुरात केली.
हेही वाचा - Drug Spraying by Drone : ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, पहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी ( St employee strike in Kolhapur ) आज चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शिधा वाटप करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. गेले 70 दिवस झाले एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर सरकार काही बोलत नाही, हे अमानवीय सरकार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे एवढे आत्महत्या होऊन सुद्धा सरकारला जाग येत नाही. हे खूनी सरकार असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. यात एमपीएससीचे विद्यार्थी, शेतकरी, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. या सर्वांचा खुनी महाराष्ट्र सरकार असून, हेच सर्वांचे मारेकरी आहेत. यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा तीव्र शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना रेशन किट देणार
70 दिवसानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुटत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात देखील पगार मिळालेले नाहीत. यामुळे त्यांचे घर चालणे मुश्कील झाले असल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना रेशन कीट देण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार - खासदारांमार्फत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना धान्याचे किट देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्याबरोबर या संघर्षात आम्ही सदैव सोबत आहोत. अनिल परब यांना देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न कसा मार्गी लागेल याचा पर्याय सांगितला. मात्र, उद्धव ठाकरे बोलायला उपलब्ध नसतात. दिवस कसे पुढे ढकलायचे हे सध्या सरकार पहात आहे. कोर्टात जरी निर्णय प्रविष्ट असला तरी तात्पुरते त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा तरी द्या, अशी विनंतीवजा सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला आहे. राज्यसरकार सर्व एसटीचे नेटवर्क मोडीत काढायचे प्रयत्न करत आहे. एसटीचे यांना खासगीकरण, सर्व डेपो असलेली जागा विकायचा घाट घातला जात आहे. यात उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालने गरजेचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊत तुमच्या दंडात ताकद किती आणि छातीत ताकद किती हे पहा
गेल्या सत्तर दिवसांपासून एसटी कर्मचारी हे एसटी संपावर आहेत. एसटीचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी ते संघर्षाची लढाई लढत आहेत. मात्र, सरकार यांच्याकडे कानाडोळा करत आहे. गेल्या 70 दिवसांपासून 70 हजार कर्मचारी संपावर बसलेले आहेत. संजय राऊत तुमच्या दंडात ताकत किती आहे आणि छातीत ताकत किती हे पहा. राज्यात 70 हजार कर्मचारी रोज संप करत आहेत. महाराष्ट्रात रोज एमपीएससीचे विद्यार्थी आत्महत्या करतात, एसटी कर्मचारी आत्महत्या करतात, रोज महिलांवर अत्याचार चालले आहेत, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळाली नाही आणि हे सर्व असताना तुम्ही स्वतःला समर्थ कस म्हणू शकता? तुम्ही फक्त पैसा खाण्यासाठी समर्थ आहात, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तर, लवकरच सर्वजण सुपातले जत्यात येणार आहेत आणि जे जात्यात आहेत ते स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत आहेत. भारत आणि चीन सीमेवर काय चालले आहे, हे पाहण्यापेक्षा राज्यात काय चालले आहे, हे पहा म्हणत तुमचे कर्तुत्व किती आणि तुम्ही करता काय, तुम्ही तर सदैव मोदींवर टीका करत असतात, तुम्ही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे काय करणार आहात ते सांगा. पेपरफुटी बद्दल काय करणार याबद्दल बोला. हे सर्व सोडून तुम्ही भारत आणि चीनबद्दल बोलत आहात, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
जे केले आहे याची क्षीरसागर यांनी आठवण ठेवावी
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी आता चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर हे इच्छुक असले तरी, शिवसेना पक्षप्रमुख निर्णय देतील ते आपल्याला मान्य असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र, त्यांनी तयारी मात्र जोरदार सुरू केलेली आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपने आपल्याला कट रचून पाडल्याचा सणसणीत आरोप भाजपसह चंद्रकांत पाटील यांच्यावर केला होता. तर, याला प्रत्युत्तर देत ते म्हणाले, मी पदवीधरसाठी दोनदा आमदारकीसाठी निवडणूक लढलो. यावेळी भाजपसह शिवसेनेने देखील मला मदत केली होती. राजेश क्षीरसागर हे पडल्यानंतर भाजपने त्यांना मदत केली नाही म्हणत मग निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मदत केली नाही का? असा सवाल क्षीरसागर यांना विचारला आहे. तर, 2009 मध्ये मिरजेत अफजलखानचा पोस्टर फाडल्यावरून दंगा झाला होता. यामध्ये त्याच नेतृत्व मी केले आणि यातून 7 आमदार निवडून आले. 2014 ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी लढले असले तरी, आम्ही राजेश क्षीरसागर हे पडावेत यासाठी आम्ही कधी प्रयत्न केला नाही. तसेच, 2019 ला मी कोथरूड विधानसभामधून निवडणूक लढवत असताना देखील मी राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराला कोल्हापुरात आलो होतो. त्यामुळे, मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जर आरोप करायचे असतील तर, काही चांगले काम केलेले देखील त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला देखील पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांना लगावला.
अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मतानुसार वागत आहेत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याबद्दल त्यांना विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन आहे की नाही याचे स्पष्टीकरण देणे तेवढेच गरजेचे नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अजून काय काय अॅडजस्टमेंट करावे लागत आहे, हे पहावे लागणार आहे. त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो तरी, शिवसेनेचे संजय राऊत बोलतात की त्यांचे सरकार नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. अशा प्रकारचे अग्रलेख सामनामधून येत असतात. मात्र, मी त्यांना घाबरत नाही. पण राज्यातील विविध भागांतून त्यांच्यावर टीका होत आहे. यामुळे त्यांच्या आपापसातल्या भांडणामुळेच सरकार पडेल. ज्यावेळेस सरकार पडेल त्या वेळेस काय करायचे, हे आम्ही पाहू. असा सूचक इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा - Ambabai Temple Kolhapur : श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या उघडल्या; कोरोना काळातही भक्तांनी दिलं भरभरून दान