कोल्हापूर - जनावरांच्या चित्तथरारक अशा अनेक स्पर्धा आपण पहिल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे बैलगाडीच्या स्पर्धा. या स्पर्धेवर आता सरकारने बंदी आणल्यामुळे आपल्याला या स्पर्धा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे कोणत्या स्पर्धा घ्यायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडलेला असतो. मात्र, गडहिंग्लज मधील एका मंडळाने बैलांच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
हलगी, तुतारी, बेंजो आणि ताशाच्या ठेक्यावर नाचणारे हे तरुण पाहून तुम्हाला वाटेल ही कुठल्या तरी निवडणुकीची विजयी मिरवणूक आहे. पण तसे नाही आहे. ही मिरवणूक आहे बळीराजासाठी राब राब राबणाऱ्या बैलजोडींची. आता यांची मिरवणूक का काढत आहेत हा प्रश्न तुमच्या मनात पडलाच असेल, तर या सर्व बैलजोड्या चालल्या आहेत एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे नाव आहे. सौंदर्य आणि सुदृढ बैलजोडी स्पर्धा. ज्याप्रमाणे आपली मुले एखाद्या परीक्षेला, स्पर्धेला जात असतात त्यावेळी आई वडील त्याला ओवाळून पाठवत असतात अगदी त्याप्रमाणेच या बैलांना या स्पर्धेसाठी अगदी वाजत गाजत पाठवतानाचे हे चित्र आहे. अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
या स्पर्धेमध्ये बैलजोडीचे केवळ देखणे रूप पाहिले जात नाही. तर बैलाची बळीराजा काशपद्धतीने निगा राखत असतो, तो बैल कुठल्या वानाचा आहे, त्याचे दात किती आहेत, त्याच्या वशिंडाचा आकार त्याच्या शिंगांची ठेवण. या सगळ्या गोष्टी स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या जातात. त्यानंतरच योग्य बैलजोडीला विजयी घोषित केले जाते.
पश्चिम महाराष्ट्रात अशापद्धतीच्या स्पर्धांचे क्वचितच आयोजन केले जाते. त्यामुळे गडहिंग्लजमधल्या या स्पर्धेसाठी शेजारच्या कर्नाटका राज्यातून देखील बैलजोड्या सुद्धा उतरल्या जातात. यामध्ये आपल्या बैलजोडीला बक्षीस नाही मिळाले तरी चालेल, पण एक समाधान म्हणून यामध्ये सहभागी होणारे सुद्धा अनेक शेतकरी आहेत. विशेष म्हणजे बळीराजाची कन्या देखील आपली बैलजोडी घेऊन या स्पर्धेमध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळाले.
खरंतर अशा प्रकारच्या स्पर्धां महाराष्ट्रासह देशभरात होणे गरजेचे आहे. शेतामध्ये या बैलांकडून मेहनत करून घेतली जाते पण अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे बळीराजाला त्याच्या या दौलतीला एक दिवस का असेना त्यांना विश्रांती मिळतेच आणि शर्यतींसारख्या चित्तथरारक स्पर्धांपासून सुद्धा या बैलांना सुट्टी मिळू शकेल.