कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अर्थात कळंबा कारागृहातील एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मधुमेह, रक्तदाबवरील गोळ्या अतिप्रमाणात सेवन करून तसेच डेटॉल लिक्विड पिऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले आहे. अतुल बाबुराव पवार (रा. वडूज, तालुका खटाव, जि. सातारा) असे या कैद्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कळंबा कारागृहात दरोडा, खंडणी विनयभंग, आत्महत्येचा प्रयत्न अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आपली शिक्षा भोगत आहे. 22 एप्रिलला रात्री त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा कारागृहातून कलंबा कारागृहात केले होते वर्ग -
कळंबा कारागृहातील कैदी अतुल पवार हा सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावचा रहिवासी आहे. सध्या तो वडूज येथे वास्तव्यास आहे. त्याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात दरोडा, खंडणी, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी सातारा कारागृहातून त्याला कळंबा कारागृहात वर्ग करण्यात आलं होतं. कळंबा कारागृहातील सर्कल सेल क्रमांक दोन मध्ये न्यायाधीन बंदी म्हणून बंदिस्त आहे. त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे तो त्याची औषध घेत असतो. मात्र गुरुवारी रात्री त्याने सर्वच गोळ्या सेवन करून तसेच डेटॉल लिक्विड बॉटल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अतुल पवार बेशुद्धावस्थेत असल्याचे पाहताच त्याला तात्काळ कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात असलेल्या सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही वाचा - रुग्णालयातील अग्निशामक सेवा आणि भारतातील रुग्णालयातील आगीच्या घटना