कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हल्ला (Govind Pansare Murder case) प्रकरणातील तीन संशयित आरोपींनी दोषमुक्त करण्याची मागणी करणारा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात (Kolhapur District Court) दाखल केला आहे. त्यावर आता 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सात वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत 12 संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. मात्र, तपास यंत्रणांना सबळ पुरावे हाती न लागल्याचा मुद्दा उपस्थित करत संशयितांच्या वकिलांनी दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे.
- पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी -
समीर गायकवाड, डॉ. विरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासाबाबत पानसरे अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोविंद पानसरेंच्या हत्येला 7 वर्षे झाली तरीही पोलिसांना आरोपींचा शोध घेता येत नाही, ना तपास पूर्ण होत आहे. यामध्ये कोणाची तरी आडकाठी येत असल्याचे म्हणत पानसरे यांच्या अनुयायांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
- गोविंद पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष -
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष उलटून गेलेत. मात्र, त्यांची हत्या कुणी केली याचा तपास आणखी लागलेला नाही. या तपासात कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कालावधीत अनेक पोलीस अधिकारी कोल्हापुरात येऊन गेले. प्रत्येक वेळी तपासात हे ना ते कारण देत कॉम्रेड पानसरे यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवले आहे. आता सध्या या प्रकरणामध्ये अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयात प्रकरण सुरू आहे. मात्र, तपास यंत्रणांकडे सबळ पुरावे नसल्याचे कारण देत संशयितांच्या वकिलांनी दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. दरम्यान, आता यावर 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.