कोल्हापूर - प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफ करावे, या मागणीसाठी भाजपच्या तालुका सरचिटणीस अजित जामदार यांनी तब्बल २५ किलोमीटरचा दंडवत घातला आहे. आघाडी सरकारने याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा, यासाठी करवीर निवासनी अंबाबाई व जोतिबा त्यांना सुबुद्धी देऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरातील शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळा इथून त्यांचे आज दिवसभर आंदोलन सुरू राहणार आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्जमाफीची घोषणा महाविकास आघाडी सरकारने करून एक वर्ष झालं मात्र या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.. सरकारला शेतकऱ्यांची फसवणूक तात्काळ थांबवावी अशी मागणी घाटगे यांनी केली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार अमंल महाडिक यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देत गडहिंग्लज तालुक्याचे भाजपचे सरचिटणीस अजित जमादार यांनी महाविकास आघाडी सरकारचा २५ किलोमीटर दंडवत घालत निषेध केला आहे.
दसरा चौकातून जमादार यांनी दंडवत घालण्यास सुरुवात केली. करवीर निवासनी अंबाबाई मातेचे दर्शन घेऊन ते दख्खनाचा राजा जोतिबा असा २५ किलोमीटरचा दंडवत घातला आहे. त्या ठिकाणी जाऊन महाविकास आघाडी सरकारला चांगली बुद्धी देवो, अशी मागणी करणार आहेत. लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ व्हावे, प्रामाणिक कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.