कोल्हापूर - सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या संथ कारभाराला गती देण्यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघाने आंदोलनाची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रावर वाजत गाजत सोमवारी लक्षवेधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिली. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - Kolhapur By-Election : 17 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ठरले वैध
कोल्हापुरात 26 जून 2020 पासून सारथी उपकेंद्र सुरू केले आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरसह सातारा, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मराठा, तसेच मराठा घटकांसाठी संशोधन, प्रशिक्षण व मानव विकासकरिता उपक्रम सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, ते सुरू न झाल्याने आता अखिल भारतीय मराठा महासंघ सोमवारी वाजत गाजत सारथीच्या निर्मितीचा अहवाल घेऊन लक्षवेधी आंदोलन करणार आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणेचे उपकेंद्र कोल्हापुरात 26 जून 2020 रोजी सुरू झाले. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यातील मराठा, मराठा कुणबी कुणबी घटकांसाठी संशोधन, प्रशिक्षण व मानव विकासकरिता उपक्रम सुरू होईल, अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येते, मात्र प्रशासनाने 26 जून 2021 पासून या उपकेंद्रामार्फत स्थानिक पातळीवर एकही उपक्रम घेतला नाही. या उपक्रमाचे उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी सारथीने सारथी पुणेची माहिती देण्यासाठी फक्त दोन कर्मचारी व एक अधिकारी नियुक्त केले आहे. यामुळे आता अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे.
सारथी पुणेच्या वतीने सध्या फेलोशिप, यूपीएससी परीक्षा शिष्यवृत्ती हे दोन उपक्रम सुरू आहेत व आठवी आणि बारावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती देणार आहेत. तसेच, सारथी संस्थेचे शाहू महाराजांचे शंभरावे स्मृती शताब्दी वर्ष असून त्याचे महत्त्व सारथीने लक्षात घ्यावे यासाठी कोल्हापुरातील उपकेंद्राला सोमवारी समविचारी संस्था संघटना यांच्या वतीने वाजत - गाजत सारथी निर्मितीचा अहवाल आणि सारथीचे ध्येय उद्दिष्टे असलेले आर्टिकल ऑफ असोसिएशन मेमोरेंडम ऑफ असोसिएशन यासह इतर अनेक उद्दिष्टपूर्तीसाठी जी माहिती अगोदरच आहे त्यांच्याकडे ढुंकून पाहत नसल्याने त्या विषयक जागृती करण्यासाठी ही माहिती वाजत-गाजत देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली व त्यांच्या जवळच्या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण मोठे आहे. त्यातच शेतीचेही तुकडे मोठ्या प्रमाणात पडले आहे. त्यामुळे युवक-युवती सारथी संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी सारथी संस्थेने उपायोजना कराव्यात यासाठी हे आंदोलन करत असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
हेही वाचा - Chandrakant Patil Tweet : ...जर काही उंदीर धावू लागले तर आश्चर्य नको; चंद्रकांत पाटलांचे सुचक ट्विट