कोल्हापूर - मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे २ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. तर, 4 फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली. तर, अवघ्या काही दिवसाच्या अंतरावर म्हणजेच, आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील निधन झाले. सिने सृष्टीने अवघ्या 5 ते 6 दिवसांत 2 मोठ्या कलाकारांना हरवल्याचे सांगत लता मंगेशकर यांना रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
प्रयाग चिखली येथे पंचगंगेच्या संगमावर अस्थी विसर्जन
रमेश देव यांचा ३० जानेवारी १९२९ रोजी अमरावती येथे जन्म झाला. मात्र, रमेश देव यांचे बालपण मात्र कोल्हापुरात गेले. रमेश देव कोल्हापुरात राहिले. इथल्या पंचगंगेत त्यांनी आयुष्यभर उड्या मारल्या, बालपण त्यांनी कोल्हापुरातच काढले. तसे कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून प्रेम देखील दिले. तेच प्रेम आमच्यावरही राहू दे, अशा भावना रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केल्या आहेत. रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन आज कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथे पंचगंगा संगमावर पंचगंगगा नदीत करण्यात आले.
मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रमेश देव यांचे वडील राजश्री शाहू महाराज यांच्या दरबारात फौजदारी वकील होते. यामुळे रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. रमेश देव यांनी पंचगंगा नदीत उड्या मारल्या, याच मातीत ते खेळले. आज रविवार दी 6 फेब्रुवारी रोजी त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी देव कुटुंबीय कोल्हापुरात आले होते.
प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदीच्या संगमाजवळ त्यांनी रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन केले. यावेळी कोल्हापूर वासियांनी जे प्रेम रमेश देव यांना दिले तेच प्रेम आमच्या वरही असू दे. आज अस्थी विसर्जन करताना भावना दाटून येत आहेत. काही चुकलं असेल तर आई अंबाबाई माफ कर, असे म्हणत आपल्या भावना अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केल्या.
भारतरत्न लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली:
आज देव परिवार कोल्हापुरात रमेश देव यांचे अस्थी विसर्जन करण्याकरिता आले होते, तेव्हा अभिनेता अजिंक्य देव यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. एकाच महिन्यात लागोपाठ काहीच दिवसांच्या अंतरावर सिनेसृष्टीला 2 मोठ्या कलाकारांना गमवावे लागले आहे. यामुळे सिनेसृष्टीत न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. रमेश देव गेल्याने खूप दुःख झाले होते. यातून बाहेर पडतोना पडतो एवढ्यात आज आपल्या सर्वांच्या लता दीदी आपल्याला सोडून गेल्या. आज रमेश देव असते तर, त्यांना ही बातमी कळताच खूप मोठा धक्का बसला असता. संपूर्ण देव कुटुंबीयाकडून लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.
रमेश देव यांनी लहानपण घालवलेल्या जागेला भेट
ज्या मातीत ते खेळले, मोठे झाले, त्याच ठिकाणी त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असल्याची भावना अभिनव देव यांनी व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी अस्थी विसर्जनानंतर सध्याचे भाजपा कार्यालय असलेले आणि पूर्वी रमेश देव यांचा वाडा असलेल्या ठिकाणी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी भागातील स्थानिक नागरिकांशी त्यांनी चर्चा देखील केली. यावेळी रमेश देव यांचे बंधू राजदत्त देव, आरती देव आणि देव कुटुंबीय उपस्थित होते.
हेही वाचा - Lata Mangeshkar Funeral : अखेरचा हा तुला दंडवत..