कोल्हापूर - 2019 नंतर यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांचा समावेश आहे. सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत न करता केवळ वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे. त्यामुळे आता हे बंद करा शिवाय शेतकऱ्यांना फसवू नका असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्त शेतकऱ्यांसह विराट मोर्चा काढला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याबरोबरच पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करण्याची मागणीसुद्धा राजू शेट्टी यांनी केली. शिवाय 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही झाल्यास नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर जलसमाधी घेऊ असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.
आम्ही तुमचे गुलाम नाही; आमचे अस्तित्व वेगळं : शेट्टी
यावेळी पूरग्रस्त शेतकरी कष्टकरी तसेच व्यापारी उद्योजकांच्या व्यथा मांडताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला लक्ष केले. मागच्या वेळी भाजप सरकारने शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली. सर्वांचे वाटोळे केले, जाती जातीत भांडणे लावत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सोडून तुमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. मात्र तुम्ही सुद्धा तेच करत असाल तर हे चालणार नाही. आम्ही तुमच्या हातात हात घातला आहे म्हणजे तुमचे गुलाम नाही. आम्ही आमचे अस्तित्व स्वतंत्र ठेवले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून जाब विचारू असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हंटले.
सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन करू
सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणत आहेत. शिवाय 30 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे आहे असे सांगतात. असे असेल तर केंद्राकडचे पैसे आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडून दिल्ली मध्ये मोदी सरकार विरोधात आंदोलन करावे. आम्ही स्वतः त्यांच्यासोबत दोन रेल्वे भरून आंदोलक घेऊन येऊ असे सुद्धा शेट्टी यांनी यावेळी म्हंटले. मात्र ते पैसे मिळाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याची आम्हाला हमी द्या असेही म्हणायला शेट्टी विसरले नाहीत.
मुश्रीफ साहेब, हवा बदलली का हे शरद पवारांना विचारायची हिम्मत आहे का ?
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टी यांची हवा बदलली का असे म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना शेट्टी म्हणाले, मुश्रीफ यांच्यात शरद पवारांना हवा बदलली का हे विचारायची हिम्मत आहे का ? पवार दोन वेळा दिल्ली येथे गेले. तिथे जाऊन मोदी, अमित शहा यांची भेट घेत आहेत. त्यामुळे हवा कोणाची बदलली हे त्यांनीच मला सांगावे असेही शेट्टी म्हणाले. शिवाय त्यांनी पवार यांना हे हिम्मत असेल तर विचाराचे असेही शेट्टींनी म्हंटले.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने राज्याला कोणताही इशारा दिला नाही - राजेश टोपे